प्रियांका गांधींनी भाजपवर साधला निशाणा; शिर्डीतून म्हणाल्या- महायुतीने महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले
मोदींचे चॅलेंज स्विकारत म्हणाल्या- बाळासाहेब ठाकरेंचा विचार वेगळा पण त्यांच्याबद्दल कायम आदर राहिला
प्रियांका गांधी म्हणाल्या की, महाराष्ट्रातील अनेक उद्योग इतर राज्यात पाठवले. यावरून देखील प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील अनेक उद्योग मागील दहा वर्षात दुसऱ्या राज्यात गेले असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला. मागील दहा वर्षापासून राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यांनी महाराष्ट्राला कमजोर करण्याचे काम केले आहे.
प्रियांका गांधी यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली सभा अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मध्ये झाली. या वेळी प्रियांका गांधी यांनी राज्य तसेच केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तर पुढे बोलताना त्यांनी मोदी-शहांना जातनिहाय जनगणना करण्याचे आवाहन देखील केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चॅलेंज कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी स्वीकारले. महाराष्ट्रातील शिर्डी येथे येऊन जाहीर सभेत संबोधित करताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असल्याची भावना व्यक्त केली. मी राहुल गांधींची बहीण आहे, मला कायम बाळासाहेब ठाकरे यांचा आदर राहिलेला आहे. जरी ते वेगळ्या विचारांनी काम करत होते. तरी देखील आम्ही त्यांचा आदर करतो, असेही त्या म्हणाल्या.
लाडकी बहीण आत्ताच कशी आठवली
राज्यात मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे. तर दुसरीकडे टॅक्सच्या माध्यमातून राज्यातील जनतेकडून पैसा वसून केला जात आहे. निवडणुका आल्यानंतर लाडकी बहिण योजनाा लागू करण्यात आल्याचा आरोप प्रियांका यांनी केला. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या हातात पंधराशे रुपये टेकवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आली की तीन-चार महिने आधी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पंधराशे रुपये दिले गेले आणि महिला आम्हाला मतदान करतील असे त्यांना वाटत आहे. मात्र बहिणींनी लक्ष्यात ठेवावे, अडीच वर्षापासून राज्यात यांचे सरकार आहे. तर दहा वर्षापासून केंद्रातही यांचेच सरकार आहे. असे असताना आताच पैसे का दिले जात आहेत?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांच्या मुद्यावरुनही घेरले
प्रियांका गांधी यांनी सभेला संबोधित करताना पुढे सांगितले की, देशभरातील शेतकरी आज संकटात सापडला आहे. कापसाला, सोयाबीनला भाव मिळत नाही. दुसरीकडे तुम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करत आहात. कांदा उत्पादक शेतकरी आज त्रस्त आहे. कांद्यावर निर्यात बंदी लावली आणि कांद्याचे भाव पाडण्यात आले. दुसरीकडे कापूस आयात करून कापसाचे भाव देखील पाडण्यात आले आहे.