बातमी कामाची : सासरी आल्यावर सुनेला अर्धी संपत्ती मिळते का? जाणून घ्या कायदा
महिलांसाठी महत्त्वाचे काय आहेत कायदे?, पतीच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा किती आहे हक्क, वाचा सविस्तर
मुंबई : प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यात दोन हक्काची घर लाभतात. एक म्हणजे लहानाची मोठी झालेलं घर म्हणजेच माहेर आणि दुसरं घर म्हणजे सासर. लग्न होऊन सासरी आल्यानंतर अगदी रेशन कार्डपासून ते लाईट बिलच्या कागदपत्रांवर घरामधील नवीन सदस्याचे नाव टाकावे लागते.
अशाप्रकारे अनेकांना असा देखील प्रश्न पडलेला असतो की, मुलगी सासरी आल्यानंतर तिचे नाव प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर समाविष्ट केले जाते की नाही. या विषयावर सविस्तर जाणून घेऊया..!
बऱ्याचदा महिलांना सामाजिकदृष्ट्या बंधनांमध्ये अडकवले जातात. परंतु कायदेशीरदृष्ट्या महिलांना बरेच अधिकार लाभले आहेत. आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की, लग्न झाल्यानंतर स्त्रियांना पतीच्या संपत्तीत अधिकार मिळतो की नाही. संपत्तीसाठी पत्नी देखील तितकीच हकदार असते का या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊ.
महिलांसाठी महत्त्वाचे काय आहेत कायदे!
महिलांसाठी काही ठोस कायदे बनवले आहेत. ज्यामध्ये हिंदू उत्तराधिकरी कायदा, भारतीय उत्तराधिकार कायदा आणि मुस्लिम वैयक्तिक कायदा या कायद्यांतर्गत मालमत्तेचा वारसा ठरवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली जाते. सांगितलेल्या कायद्याप्रमाणे केवळ लग्न झाल्यानंतर स्त्रीला पतीच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळत नाही तर ही गोष्ट पूर्णपणे परिस्थितीवर अवलंबून असते.
पतीच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा हक्क
भारतीय कायद्यानुसार पतीच्या संपत्ती पत्नीला तोपर्यंत हक्क नसतो जोपर्यंत पतीचा मृत्यू होत नाही. म्हणजेच पती जिवंत असताना पतीच्या प्रॉपर्टीत पत्नीला हक्क नाही. पतीच्या मृत्यूनंतरच पत्नी त्याच्या मालमत्तेची हक्कदार बनते. तेसुद्धा पतीने मरण्यापूर्वी इच्छापत्र लिहून ठेवल्यानंतरच. त्याचबरोबर दोघांमध्ये घटस्फोट किंवा दोघेही एकमेकांपासून विभक्त झाल्यास महिलेला पतीकडून पोटगी मिळवण्याचा पूर्णपणे अधिकार असतो.
विभक्त म्हणजेच दोघेही एकमेकांपासून कायदेशीररीत्या वेगळे झाल्यानंतर पत्नी पतीच्या संपत्तीवर हक्क सांगू शकत नाही. त्याचबरोबर कायद्यानुसार सुनेला सासर्याच्या किंवा पतीच्या वडीलोपार्जित संपत्तीत पती किंवा सासरे जिवंत असेपर्यंत हक्क सांगता येत नाही. दरम्यान पतीच्या मृत्यूनंतरच मालमत्तेत हक्क मिळू शकतो.