अजित पवार अशा लोकांसोबत राहिले ज्यांनी... फडणवीसांनी 'बटेंगे तो कटेंगे'चा अर्थ सांगितला...
एनआयएच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी विविध विषयावर केले मोठे खुलासे
अजित पवार बराच काळ अशा लोकांसोबत राहिले, ज्यांना हिंदूंचा विरोध हाच सेक्युलसिझम वाटतोय. अजितदादा त्या लोकांसोबत राहिलेत ज्यांनी फक्त हिंदूंना विरोध केलाय. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे हे समजायला दादांना थोडा वेळ लागेल, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी या घोषणेला समर्थन दर्शवलं.
फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एएनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकारणाबाबत आपली मतं व्यक्त केली. महायुतीच्या प्रचाराबद्दल आणि कटेंगे तो बटेंगेसारख्या नाऱ्यांबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांनी 'कटेंगे तो बटेगें'च्या नाऱ्याला विरोध केला होता. तसेच अशोक चव्हाण आणि पंकजा मुंडे यांनीही या घोषणा चालणार नसल्याचं म्हटलं होतं. यानंतर महायुतीमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता फडणवीसांनी याबाबत महायुतीची भूमिका स्पष्ट केली.
दोन्ही घोषणांना महायुतीचं समर्थन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'एक हैं तो सेफ'च्या नाऱ्याला फारसा विरोध झाला नाही. योगी आदित्यनाथ यांनी 'बटेंगे तो कटेंगे' घोषणा दिली. त्यावर मात्र विरोधकांनी महायुतीवर आरोप केले. महायुतीतील काही नेते या घोषणेवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. या सर्व मुद्द्यांवर फडणवीसांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, आपल्याला या विधानात काहीच चूक वाटत नाही. या देशाचा इतिहास पाहिलं तर लक्षात येतं की, जात, प्रांत, समुदायांमध्ये देश जेव्हा वाटला गेला, तेव्हा नुकसान झालं. या दोन्ही घोषणांचा अनर्थ काढण्यात आलाय.
"अजितदादांना थोडा वेळ लागेल"
अजित पवार, पंकजा मुंडे यांच्या भूमिकेबद्दल विचारलं असतं, फडणवीस म्हणाले की, या लोकांना एक तर जनतेचं मत कळत नाहीये किंवा त्यांना या शब्दांचा अर्थ समजत नाहीये किंवा त्यांना काहीतरी वेगळं म्हणायचं होतं, हे तीन मुद्दे असू शकतात. अजित पवार गेली अनेक दशकं अशा लोकांसोबत राहिले आहेत, ज्यांच्यासाठी हिंदुत्वाचा विरोध करणं हाच सेक्युलरीझम होता. ते लोक खरे सेक्युलर नव्हते. त्यामुळे जनतेचं मत आणि राष्ट्रवाद समजायला त्यांना थोडा वेळ लागेल. बटेंगे तो कटेंगे हा नारा एकत्रित करण्यासाठी आहे. कारण एकत्र राहू तरच विकास होईल, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.