महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
प्रचारतोफा थंडावल्या, सत्ताधारी विरोधकांनी केले एकमेकांवर जोरदार वार
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या प्रचार तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या आहेत. तर आता उद्याचा दिवस अर्थात मंगळवारी गुप्त बैठकांवर पक्षांकडून जोर असणार आहे. दुसरीकडे निवडणूक आय़ोगाची देखील करडी नजर त्यांच्यावर असणार आहे. दरम्यान, बुधवारी मतदान आणि शनिवारी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
RCC New
बुधवारी दि. 20 रोजी मतदान
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी एका टप्प्यात मतदान होणार आहे. त्यात राज्यातील 4 कोटी 95 लाख पुरुष व 4 कोटी 64 लाख महिला मतदारांसह एकूण 9 कोटी 59 लाख मतदार आपला मताधिकार बजावतील. हे मतदार 4136 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतदान यंत्रात बंद करतील.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 4136 उमेदवारांपैकी 490 उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांचे, 496 उमेदवार प्रादेशिक पक्षांचे, 1036 उमेदवार मान्यता नसलेल्या पक्षांचे, तर 2087 उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहेत.
सेना, NCP फूटीनंतर पहिलीच निवडणूक
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना या निवडणुकीद्वारे आपलाच गट खरा राष्ट्रवादी व शिवसेना आहे हे दाखवून देण्याची नामी संधी आहे. त्यात शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात सभा घेत अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. भाजपने आपल्याला कसा धोका दिला? व एकनाथ शिंदे यांनी आपल्याशी कशी गद्दारी केली? हे उद्धव ठाकरे यांनी मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.
शरद पवार यांनी या प्रकरणी भाजपवर प्रहार करत अजित पवार यांच्यासह त्यांच्या सहकारी आमदारांना पाडण्याचे आवाहन केले. या प्रकरणी मोदी - शहांच्या भाजपपासून महाराष्ट्राचा बचाव करणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करत मराठी अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न केला.
महायुतीचा प्रचार होता हिंदूत्व आधारीत
दुसरीकडे, भाजप व महायुतीचा संपूर्ण प्रचार हिंदुत्वाच्या मुद्याभोवती फिरता राहिला. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात महायुतीने विकासाच्या जोरावर मते मागितली. त्यानंतर हा प्रचार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या 'बटेंगे तो कटेंगे' व त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक है तो सेफ है'च्या दिशेने पुढे सरकला.
शनिवारी होईल सर्वांचा फैसला
दरम्यान, महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांनी या निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. पण मतदार अखेरच्या क्षणी कुणाच्या पारड्यात आपले मतदान टाकतील हे बुधवारी होणारे मतदान व त्यानंतर शनिवारी होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.