ज्यांचे मालक अदानी, ते कधीच CM होणार नाहीत; आदित्य ठाकरेंचा महायुतीवर निशाणा
धारावी गिळंकृत करू पाहणाऱ्यांना जनता घरचा मार्ग दाखवणार, ठाकरेंचा विश्वास
Maharashtra Assembly Election 2024 : आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात आता अदानी ज्यांचे मालक आहेत. त्या लोकांचे सरकार येणार नाही. संपूर्ण धारावी गिळू पाहत असलेल्या अदानींना आमचा विरोध असणार आहे. त्यासाठी आमची ही लढाई आहे. त्यामुळे कोणीही येथे मैदानात असले तरी विजय मात्र हा महाविकास आघाडीचाच होणार आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, धारावीतील लोकांच्या सेवेसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी गायकवाड कुटुंब कार्यरत आहे. यात प्रामुख्याने वर्षाताई गायकवाड असो किंवा आता ज्योतीताई गायकवाड असो. या लोकांना या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. धारावीत येऊन गिळंकृत करू पाहणाऱ्या लोकांना धारावीतील लोकच उत्तर देतील, असा विश्वास देखील आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
ज्यांचे मालक अदानी आहेत, ते कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. धारावी येथील महाविकास आघाडीच्या उमेदवार ज्योती गायकवाड यांच्या प्रचारासाठी ठाकरे हे धारावीत रोड शो करत होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे फडणवीस व महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.
खासदार वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आज जी रॅली धारावीत निघाली आहे त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांची नक्कीच धडकी भरणार यात शंका नाही. धारावीत विकासाच्या नावाखाली येथील लोकांची जमीन हडप करू पाहणाऱ्यांना आम्ही कधीही येथे येऊ देणार नाही. त्यांचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. असेही वर्षा गायकवाड यांनी प्रतिपादन केले.