ICC Player Ranking 2024 : शाहीन आफ्रिदी बनला पुन्हा एकदा नंबर-1 वनडे गोलंदाज
फलंदाजीत बाबर आझम टॉप; सूर्यकूमारला गमवावे लागले टी-20 मध्ये एक स्थान, वाचा सविस्तर
ICC Player Ranking 2024 : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी पुन्हा एकदा आयसीसी वनडे गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसीने बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर केली.
बाबर आझम फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. यासोबतच एकदिवसीय फलंदाजी आणि गोलंदाजी क्रमवारीत पाकिस्तानी खेळाडू अव्वल स्थानावर आहेत. दरम्यान, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला टी-20 फलंदाजी क्रमवारीत एक स्थान गमवावे लागले आहे.
आफ्रिदीची ऑस्ट्रेविरुद्ध चमकदार कामगिरी
आफ्रिदीने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याने तीन सामन्यांत 3.76 च्या इकॉनॉमी रेटने 8 विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे आफ्रिदीने क्रमवारीत तीन स्थानांनी झेप घेतली आहे. त्याने केशव महाराजला अव्वल स्थानावरून हटवले. महाराज दोन स्थानांवरून खाली घसरले आहेत. तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर राशिद खान दुसऱ्या स्थानावर कायम आहे. आफ्रिदीने याआधी गेल्या वर्षी भारतात झालेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत प्रथम क्रमांकाची गोलंदाजी रँकिंग गाठली होती.
रौफला 14 स्थानांचा फायदा झाला
आफ्रिदीशिवाय त्याचा सहकारी गोलंदाज हरिस रौफ यालाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे क्रमवारीत फायदा झाला आहे. तो 14 स्थानांवर चढून 13व्या स्थानावर पोहोचला आहे. रौफचे हे वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने 5 च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी केली आणि 10 बळी घेतले. तो मालिकावीर ठरला.