शरद पवारांचे फोटो न वापरता स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढवा
सुप्रीम कोर्टाने दिले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला निर्देश, चिन्हाबाबतही सूचना
Supreme Court Hearing On NCP Party : राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत आज 13 नोव्हेंबर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांचे फोटो वापरु नका. स्वतंत्र पक्ष म्हणून लढा, असे निर्देश अजितदादाच्या गटाला दिले आहेत. तसेच पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.
'निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करा'
अजित पवार गट आणि शरद पवार गटाने निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत केली आहे. अजित पवारांकडून वारंवार शरद पवारांच्या फोटोचा वापर केला जातो, अशी तक्रार शरद पवारांच्या वकिलाने केली आहे. याप्रकरणी बोलताना कोर्टाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलं. दरवेळी मतदारांवर व्हिडिओ वगैरेचा प्रभाव पडेलच असे नाही, कधी कधी तो प्रभाव पडतो. आपल्या देशातील जनता खूप हुशार आहे, त्यांना कोणी फसवू शकत नाही, असा सल्ला कोर्टाने दिला आहे.
तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे
यावेळी सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जरी तो व्हिडिओ जुना असेल किंवा काहीही असले तरी तुम्ही शरद पवारांचा चेहरा का वापरता? असा सवाल अजित पवारांना विचारण्यात आला.
तुमच्या सगळ्या उमेदवारांनी शरद पवारांचे फोटो , व्हिडीओ कशाला वापरले पाहिजे. जर तुमचे वैचारिक मतभेद आहेत, तर तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, असे अजित पवार गटाला खडसावले. आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांचे फोटो व्हिडीओ वापरत नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार गटाने दिले.
यापूर्वीच्या सुनावणीत डिस्क्लेमरचे निर्देश
यापूर्वी या प्रकरणावर बुधवारी 6 नोव्हेंबर रोजी न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी घड्याळ निवडणूक चिन्हाचा मुद्दा न्यायालयात असल्याचे डिस्क्लेमर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी 36 तासांच्या आत वर्तमानपत्रात प्रकाशित करावे, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. कोर्टात वेळ वाया घालवू नका, तर मतदारांना आकर्षित करा, असेही न्यायालयाने शरद पवार गट आणि अजित पवार गटाला सांगितले होते.