राज्यात अनेक बंडखोरांची माघार, मात्र अनेक ठिकाणी तिरंगी लढत!
जाणून घ्या- कोणत्या मतदारसंघात काय असणार स्थिती, वाचा सविस्तर
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेत पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला. राज्यातील 288 मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले असून, काही मतदारसंघात बंडखोरी कायम आहे. काही ठिकाणी बंडखोरांमुळे तिरंगी लढती होणार आहेत. राज्यात प्रमुख बंडखोरांनी कोठे बंडखोरी केली व कोठे बंडखोरी टळली ते पाहू.
१. सोलापूर दक्षिणमध्ये दिलीप माने हेच काँग्रेसचे उमेदवार असतील, असं सांगून देखील काँग्रेसनं त्यांना एबी फॉर्म दिला नव्हता. त्यानंतर दिलीप मानेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्यादिवशी दिलीप माने व त्यांच्या मुलाने अर्ज माघारी घेतली आहे.
२. सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार दिलीप माने आणि त्यांच्या मुलगा पृथ्वीराज माने दोघांचे अर्ज माघारी घेतले. मात्र, काँग्रेसचे दुसरे बंडखोर धर्मराज काडादी यांचा अर्ज अद्यापही कायम आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येते.
३. सोलापूर शहर उत्तरमधून भाजपच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांची बंडखोरी कायम आहे. भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर शोभा बनशेट्टी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शोभा बनशेट्टी या भाजपच्या माजी महापौर असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत.
४. धाराशिव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे, जिल्हा संघटक सुधीर पाटील व कळंबचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे या तिघांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर माघार घेतल्याची माहिती आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे कैलास पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे अजित पिंगळे यांच्यात थेट लढत होणार आहे.
५. परंडा विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाच्या रणजीत पाटील यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीतील तिढा सुटला. परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांच्यात थेट लढत होणार आहे.
६. इंदापूरमध्ये प्रवीण मानेंची बंडखोरी कायम, तिरंगी लढत होणार असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले.
७. शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात भाजपच्याच राजेंद्र पिपाडा यांची बंडखोरी कायम आहे. तेथे काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांच्याविरोधात हा सामना रंगणार आहे. पिपाडा यांनी अर्ज कायम ठेवल्याने तेथे तिरंगी लढत होत आहे.
८. आंबेगावात महाविकास आघाडीत बंडखोरी कायम राहीली.
९. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव-पार्थडीमधून भाजपाच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे तेथे विद्यमान आ. मोनिका राजळे यांचे पारडे जड समजले जात आहे.
१०. पुरंदरमध्ये महायुतीत बंडखोरी कायम आहे. तेथे अजित पवार गटाच्या संभाजी झेंडेंची माघार घेतली नाही.
११. राज्याचे लक्ष लागलेल्या माहीम मतदारसंघातही सदा सरवणकरांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. राज ठाकरे यांनी शेवटच्या क्षणी भेट नाकारल्याने सरवरणकारांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. तेथे आता अमित ठाकरेंना तिरंगी लढत द्यावी लागणार आहे.