महायुतीच्या काळात फक्त 'अदाणी सेफ'; गडचिरोलीतून प्रियांका गांधींचा हल्लाबोल
सरकार जनतेला उत्तरदायी असते, पण भाजपने मागील 10 वर्षांपासून ही परंपरा मोडीत काढली आहे. एक है तो सेफ है च्या घोषणा दिल्या जातात, पण मोदींच्या राज्यात केवळ अदाणी हेच सेफ आहेत, असा घणाघात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना केला. तर भाजप धर्माच्या आधारावर जनतेचे लक्ष विचलित करत आहेत, असाही निशाणा त्यांनी लगावला. त्या गडचिरोली येथे आयोजित सभेत बोलत होत्या.
RCC New
प्रियांका गांधी म्हणाल्या, भाजपचे नेते शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मोठमोठ्या गप्पा हाणतात अन् दुसरीकडे छत्रपती शिवरायांचा अपमान देखील करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी 7 वर्षांपूर्वी अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे उद्घाटन केले होते. परंतु, अद्याप काम सुरू केले नाही. भ्रष्टाचारामुळे सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा देखील कोसळला. एक है तो सेफ अशा घोषणा दिल्या जात आहे. मोदींच्या राज्यात केवळ अदाणी हेच सेफ आहेत.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, भाजप सरकारच्या काळात शेतकरी, मजूर, महिला आणि उद्योग सुरक्षित नाहीत. केवळ पोकळ घोषणा करून जनतेची फसवणूक केली जात आहे. निवडणुकीनंतर एकही घोषणा पूर्ण करण्याची गरज नाही, अशी भाजपची मानसिकता आहे, असे म्हणत त्यांनी घणाघात केला.
काँग्रेसने कायम वादे पूर्ण केले
काँग्रेस सरकारने इतर राज्यांत गॅरंटी दिली होती. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश मध्ये दिलेली गॅरंटी निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण केली. निवडणुका जवळ आल्यावर मुख्य मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित केले जाते. जाती, धर्माच्या आधारावर जनतेचे लक्ष विचलित केले जाते. सरकार जनतेला उत्तरदायी असते, पण भाजपने मागील 10 वर्षांपासून ही परंपरा मोडीत काढली आहे.
सर्वाधिक तरुणांच्या आत्महत्या महाराष्ट्रात
प्रियांका गांधी-वड्रा पुढे बोलताना म्हणाल्या की, गेल्या 10 वर्षांत महागाई प्रचंड वाढली आहे. महागाईमुळे लोक सण साजरे करू शकत नाहीत. जीएसटीमुळे छोटे दुकानदार, व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. सरकारी परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत. आज महाराष्ट्रात अडीच लाख पदे रिक्त असून ते भरले नाहीत. महाराष्ट्रात तरुणांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असल्याचा असल्याचा दावा देखील त्यांनी केला.