मी ठरवलं तर अनेकांचा कार्यक्रम करतो; येवल्यात सभा घेऊन जरांगेंचा भुजबळांना इशारा
म्हणाले- ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाच्या मागण्यात अडथळा आणला त्याचा निवडणुकीतून पाडा
येवला : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ला असलेल्या येवला मतदारसंघात जाऊन सभा घेतली. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विरोध करणाऱ्या दोघांना निवडणुकीत पाडा असे आवाहन केले.
RCC New
महाराष्ट्र विधानसभेची निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे राजकीय प्रचाराला वेग आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शनिवारी छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. त्यात त्यांनी इथे दोघांना पाडा असे आवाहन केले. यावेळी त्यांनी मात्र कुणाचे नाव घेतले नसले तरी छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
भुजबळ काका पुतण्याला कुणाचे आव्हान?
छगन भुजबळ हे येवला - लासलगाव मतदारसंघातून मैदानात आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या माणिकराव शिंदे यांनी आव्हान दिले. तर समीर भुजबळ हे नांदगाव - मनमाड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार सुहास कांदे व ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांच्याशी आहे. या तिरंगी लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
मी ठरवले तर करेक्ट कार्यक्रम करू शकतो
येवल्यात विशेष असे काहीच नाही. हा मतदारसंघ काही राज्याबाहेर नाही. माझ्या पोटात एक आणि ओठात एक असे नाही. मी ठरवले की डायरेक्ट कार्यक्रम करतो. आता एक माईक जुना झाला म्हणून दुसरा हातात घेतला. पण तो ही सारखा सारखा बिघडत आहे, असे ते म्हणाले.