माझ्यामध्ये CM बदलण्याची ताकद, किरकोळ लोकांना जुमानत नाही; सत्तारांचा दानवेंचा टोला
म्हणाले- मला कुत्रा जरी निशाणी मिळाली तरी देखील मी निवडून येईल, महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. जोरदार प्रचारसभांनी राजकारण चांगलंच तापलेलं आहे. महायुती व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर फैरी झाडत आहेत, अशातच सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त विधान करुन महायुतीचाच भाग असलेले भाजप नेते रावसाहेब दानवे यांना डिवचलं आहे.
माझ्यात राज्याचा मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे, त्यामुळे मला कुत्र्याची निशाणी मिळाली तरी मी निवडून येऊ शकतो, त्यामुळे काही किरकोळ लोकांना हे कधीच कळणार नाही, असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता टोला लगावला. या विधानामुळे महायुतीतच वाद वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
माझा सामना करण्याची ताकद नाही
अब्दुल सत्तार यांची नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा येथे सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे. त्यामुळे हे असले किरकोळ लोक माझे काय करणार? त्यांच्यात माझा सामना करण्याची ताकद नाही. मी मागील 25 वर्षांत मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. त्यामुळे जो विकासकामे करतो त्यालाच मतदान करा, असे ते म्हणाले.
कुत्रा निशाणी मिळाली तरी निवडून येईल
मला कुत्रा निशाणी मिळाली तरी मी निवडून येऊ शकतो. यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जाती-पातीवर मते मागण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात मोजून चार-पाच नेते आहेत. त्यात माझे नाव आहे. पण काही लोक यामुळे माझ्यावर फार जळतात, असेही अब्दुल सत्तार यावेळी बोलताना म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे अब्दुल्ल सत्तार व रावसाहेब दानवे यांच्यात राजकीय शत्रूत्व आहे. ते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्या झालेल्या पराभवामागेही सत्तार यांचाच काहीअंशी हात असल्याचा दावा केला जातो. आता विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे आपल्या पराभवाचे उट्टे काढण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी त्यांच्यावर जाती-पातीचे राजकारण करण्याचा आरोप केला आहे.
दुसरीकडे, अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांच्यापुढे सुरेश बनकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामु्ळे येथे तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांनी 3 वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. आता त्यांना चौथ्यांदा येथून त्यांचा विधानसभेवर जाण्याचा प्रयत्न आहे. यासाठी ते जोमाने प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे.