कोणत्याही स्थितीत गद्दारांना गाडणार; सत्ताधाऱ्यांनी सरकारची तिजोरी लुटली; ठाकरेंची तोफ धडाडली
कर्जत : विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकार काम भारी केल्याची जाहिरातबाजी करत आहे. पण त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे नव्हे तर त्याची तिजोरी लुटण्याचे एकमेव काम भारी केले आहे, असे ते म्हणालेत.
RCC New
उद्धव ठाकरे यांची सोमवारी कर्जतमध्ये प्रचारसभा झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसह भाजप महायुतीवर टीकेचे आसूड ओढले.
कोणत्याही स्थितीत गद्दारांना गाडणार
उद्धव ठाकरे म्हणाले, माझा महाराष्ट्र कोरोना महामारीचा सामना केला होता. तेव्हा औषधे किंवा उपचार काहीही वेळेवर मिळत नव्हते. महाराष्ट्र तळमळत होता. आपण पूर्ण ताकदीने लढत होतो. पण त्या वेळीही हे भाजपवाले राज्य सरकारला मदत न करता पीएम केअर फंडासाठी पैसे देत होते. हे त्यांचे महाराष्ट्रावरील प्रेम आहे.
भाजपच्या एका उमेदवाराने तर मृत व्यक्ती जिवंत दाखवून पैसे खाल्ले. याऊलट माझ्याकडे स्वच्छ चारित्र्याचे आहेत. हे सर्वजण हाकेला धावून येणारी माणसं आहेत. मी मुद्दामहून इकडे आलो. कारण मला गद्दाराला कोणत्याही स्थितीत गाडायचे आहे. मी ज्या क्षणी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सोडले, तेव्हा मला पहिल्यांदा कोरोना झाला होता. माझे नुकतेच ऑपरेशन झाले होते. डॉक्टरांनी आरामाचा व जनतेत न मिसळण्याचा सल्ला दिला होता. पण मी सांगितले जनतेकडे जाणार नाही तर कुणाकडे जाणार? असा प्रश्न केला होता.
मी त्यावेळी जनतेचे अफाट प्रेम अनुभवत होतो. तर त्यावेळी येथील गद्दार उमेदवार (महेंद्र थोरवे) हातात दारूचा प्याला घेऊन टेबलावर नाचत होता. माझा वैयक्तिक कोणताही स्वार्थ नाही. पण गद्दारी सेलिब्रेट करणारा आपला आमदार होऊ शकतो? बाकी गद्दारी माझ्यावर सोडा. त्यानंतर त्याला खडी फोडायला पाठवले नाही तर सांगा. नाही तर यांचा सर्वकाही चोरीचा मामला आहे. त्यामुळे त्यांचा माज उतरावाच लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हजारो कोटींनी महाराष्ट्र लुटला
ते पुढे म्हणाले, या लोकांनी जनतेला धोके देऊन स्वतःला खोके घेतले. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही हिशेब नाही. राज्यातील ज्या - ज्या ठिकाणी गद्दारी झाली त्या ठिकाणी हेच चित्र आहे. या मतदारसंघांत अनेक कंत्राटे देण्यात आले. सरकारच्या तिजोरीतून पैसा देण्यात आला, पण तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलाच नाही. मग कुणी खाल्ला हा पैसा? आता 50 खोके यांच्यासाठी सुटे पैसे झालेत. या लोकांनी हजारो कोटींनी महाराष्ट्र लुटला आहे.
या निवडणुकीत पैशाचा महापूर आला आहे. माझ्या उमेदवारांकडे तेवढे पैसे नाहीत. त्यामुळे शिवसैनिकांनी आपल्या निष्ठेचा खडक त्यात वाहून जाऊ देऊ नये. लक्षात ठेवा, महापूर येतो आणि जातो. पण पैसे घेऊन मते विकत घेणारी ही औलाद महाराष्ट्राला काय सुख देणार? या लोकांनी ठिकठिकाणी जाहिरातबाजी सुरू केली आहे. केलंय काम भारी, लुटली तिजोरी. केली गद्दारी, पुढे लाचारी. आता या लोकांना नव्हे तर गुवाहाटीला पाठवून द्या, असे ते म्हणाले.