औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करावे ही बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली - नरेंद्र मोदी
म्हणाले - मराठवाड्याचा विकास महायुतीच करु शकते
Narendra Modi campaign rally in Chhatrapati Sambhajinagar : महायुतीच्या प्रचारार्थ गुरुवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट सभा घेतली. त्यात हिंदूत्वाच्या मुद्याला हात घातल त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. आम्ही या शहराचं नाव बदलून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची इच्छा पूर्ण केली, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंच्या आठवणींनाही उजाळा दिला.
बाळासाहेब ठाकरेंची काढली आठवण
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करावे, अशी स्व. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. ती इच्छा महायुतीसरकार आल्यावर पुर्ण झाली. मात्र याचं सगळ्याच जास्त दुःख काँग्रेसला झालं. काँग्रेसच्या काळात जे नामकरण झालं नाही, ते महायुती सरकारच्या काळात झालं. त्यानंतर हे बदललं नाव पुन्हा बदलण्यासाठी काँग्रेस न्यायालयापर्यंत गेलं. ज्यांना संभाजी महाराजांच्या नावावर आपत्ती आहे त्यांना त्यांच्या हत्यारामध्ये मसीहा दिसतो, असं म्हणत पंतप्रधानांनी महाविकास आघाडी व उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.
मराठवाड्याचा विकास महायुतीच करु शकते
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारला शुभेच्छा दिल्या. काँग्रेस व महाविकास आघाडीला आता लोकांनी ओळखले आहे. त्यामुळे या लोकांचा स्वीकार महाराष्ट्र करणार नाही असे म्हणत मोदी म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासात छत्रपती संभाजीनगरचं मोठं योगदान राहणार आहे. महायुतीमुळे पायाभूत सुविधा मिळत आहेत. समृद्धी महामार्ग संभाजीनगरमधून जात असल्याने तो आता मराठवाडा व मुंबईला थेट जोडला गेलाय. त्यामुळे या शहराचा विकासही आता वेगाने होईल. मात्र हा विकास साधायचा असेल तर महायुतीला निवडून द्यावं लागेल.