'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' : महाराष्ट्राच्या निवडणुकीत रंगतोय जातीयवादाचा मुद्दा
मोदी-योगी-शहांच्या सभेत एकच नारा;'मविआ' नेत्यांनी घेतलाय आक्षेप, जनतेचा कौल कुणाला?
Maharashtra Casteism Prachar point : विधानसभा निवडणुकीत 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'एक है तो सेफ है' च्या घोषणा भाजप नेत्यांकडून दिल्या जात आहे. भाजपनं हिंदू मतांच्या एकीसाठी ही घोषणा दिलीये हे लपून राहिलेलं नाही.
दुसरीकडे, शरद पवारांनी भाजपच्या या रणनितीवर टीका केलीय. भाजप निवडणुकीत जातीयवाद करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय. तर दुसरीकडे मोदी देखील प्रत्येक सभेमध्ये कॉंग्रेसवर जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप लावत आहेत. एकंदरीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात जातीयवादाचा मुद्दा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या पहिल्या प्रचारसभेपासून एक है तो सेफ है चा नारा दिलाय. तर योगी यांनी 'बटेंगे तो कटेंगे' असा नारा देत हिंदू मतदारांना एक प्रकारे सजग होण्याचे आवाहन केले.
ठाकरे, राऊतांनीही लगावला टोला
'एक है तो सेफ है' या भाजपच्या घोषणेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही निशाणा साधलाय. मोदी आणि शहांच्या महाराष्ट्रातील प्रचारामुळं सामान्यांना असुरक्षित वाटू लागल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला.
अजित पवारांचाही घोषणेला विरोध
दुसरीकडे महायुतीचे एक बडे नेते अजित पवार यांनी देखील योगी, मोदींच्या विधानाला विरोध दर्शविला आहे. महाराष्ट्रातल्या मतदार उत्तरेतील राज्यांतील मतदारांसारखा नाही. त्यामुळं बटेंगे तो कटेंगे ची घोषणा महाराष्ट्रात चालणार नाही असे स्पष्ट विधान अजित पवारांनी केले.
'मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीत प्रचारसभा घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढील हिंदूह्रदयसम्राट उपाधी काढण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटेल म्हणून त्यांनी ते काढून टाकलं अशी टीका राज ठाकरेंनी केलं.
तसंच आज त्याच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल मौलवी फतवा काढतात असा संतापही त्यांनी व्यक्त केला."मुस्लिम मौलवी आज फतवे काढत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले हे तुम्हाला माहित आहे. विचारधारा नावाची काही गोष्ट नाही. तर मौलवी जर उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढत असतील, तर मी देखील हिंदूंना जाहीर आवाहन करतो की, त्यांनी देखील हिंदू म्हणून एकत्र येऊन मतदान केले पाहिजे.