'गद्दाराचा पापाचा घडा भरला, त्याला तुरूंगात डांबल्याशिवाय सोडणार नाही'
उद्धव ठाकरेंचा मंत्री अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल; म्हणाले- माझ्याकडे जनशक्ती
सिल्लोड: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना तुरुंगात डांबण्याचा इशारा दिला. सिल्लोडच्या गद्दाराचा पापाचा घडा भरला असून, मी त्याची चौकशी करून त्याला तुरुंगात डांबल्याशिवाय व येथील जनतेला भयमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी महिलांना दरमहा 3 हजार रुपयांचे अर्थसहाय्य व सर्वसामान्य जनतेला 5 जिवनावश्यक वस्तुंचे भाव 5 वर्षांसाठी स्थिर ठेवण्याचीही ग्वाही ही दिली.
उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी दुपारी सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सभा झाली. या सभेद्वारे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यासह शिंदे, पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली.
उद्धव ठाकरे म्हणाले, आज सगळ्या यंत्रणा भाजप व महायुतीच्या ताब्यात आहेत. पण आज मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटले. कारण, हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर आज माझी बॅगच कुणी तपासली नाही. माझे महत्त्व एवढे कमी झाले की काय? ठीक आहे, तसे पाहिले तर सिल्लोड हा मतदारसंघ जालन्यात येतो. येथील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत जे काही करायचे होते करून दाखवले. येथून कल्याण काळे यांना लोकसभेवर पाठवले. आता या सभेला जमलेल्या गर्दीवरूनही भविष्यातील विजयाची शाश्वती मिळत आहे.
मोदींच्या मुंबईतील सभेवर निशाणा
उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेवरही निशाणा साधला. ते म्हणाले, आज अनेकजण गर्दी जमवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण गर्दीच जमत नाही. काल मुंबईतही गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला. त्यात खुर्च्यांची गर्दी खूप झाली, पण माणसेच आली नाही. आम्हाला माणसे आणावी लागत नाहीत. कारण आपल्याकडे सर्व माणसे जिवाभावाची आहेत. आम्ही येथील एकाही माणसाला भाड्याने आणले नाही. हे सर्वजण मनातून आलेत. या सिल्लोडमधील गुंडागर्दी, दडपशाही, हुकूमशाही गाडून टाकण्यासाठी व जाळून टाकण्यासाठी हे लोक आलेत.
एका पत्रकाराने मला 'मिंधे' असे म्हणाले तसे म्हणाले असा प्रश्न केला. मी त्याला म्हणालो, जाऊ दे आता त्या मिंधेंच्या चिंध्या होणार आहेत... पण विशेष म्हणजे त्यांनी मला सुरक्षेवरही प्रश्न विचारला. त्यावर मी म्हणालो, प्रश्न महिला सुरक्षेचा असेल तर मग सिल्लोडमधील गद्दाराने सुप्रिया सुळे यांना जी शिवीगाळ केली त्याचे काय झाले? काल तोच माणूस उमेदवार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर होता. त्यामुळे आता मोदींनीच हीच त्यांचे हिंदुत्व व संस्कृती आहे का हे सांगावे. याच मोदींनी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात प्रज्ज्वल रेवण्णा नामक बलात्काऱ्याचा प्रचार केला होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ही सिल्लोडमधील गुंडागर्दी घालवण्याची संधी
या सरकारने गोरगरिबांची झोप उडवली. पण तुम्ही तुमच्या मालमत्ता भरपूर करून ठेवल्या आहेत. हे यापुढे चालणार नाही. जनता एकवटली तर कुणी कितीही मोठा असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही, हा या देशाचा इतिहास आहे. त्यामुळे मी भाजपच्या लोकांनीही सिल्लोड येथील गुंडागर्दी घालवून देण्याची ही संधी सोडू नये. भाजपचा सच्चा कार्यकर्ता ही गुंडागर्दी मोडून काढल्याशिवाय राहणार नाही हे मला माहिती आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन गुंडागर्दी मोडून काढूया, असे उद्धव ठाकरे यावेळी अब्दुल सत्तार यांचा नामोल्लेख टाळत म्हणाले.
त्यांच्याकडे धनशक्ती, माझ्याकडे जनशक्ती
उद्धव ठाकरे म्हणाले, आपण गद्दार नाही. त्यामुळे आपल्याकडे पैशांचा महापूर नाही. त्यांच्याकडे पैशांची धनशक्ती आहे. माझ्याकडे जिवाभावाची जनशक्ती आहे. मी जे करता येते, तेच बोलतो. पण एकदा तुम्ही या येथील गद्दाराला पाडा, पाडा नाही तर थेट गाडाच. कारण आता याच्या पापाचा घडा भरला आहे. त्याची चौकशी करून त्याला तुरुंगात डांबल्याशिवाय, येथील जनतेला भयमुक्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे वचन मी देतो.
यासाठीच ही निवडणूक केवळ उद्धव ठाकरे यांच्यासाठीच महत्त्वाची नाही तर तुम्ही तुमचे आयुष्य कुणाच्या हातात देणार यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही तुमचे आयुष्य, तुमच्या मुलाबाळांचे आयुष्य, त्यांचे भविष्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या हातात देणार आहात की तुमच्यावर दादागिरी करणाऱ्या गद्दाराच्या हातात देणार आहात हे ठरवणारी ही निवडणूक आहे. मी सांगण्याचे काम केले. उत्तर तुम्ही द्यायचे आहे.