लातूरच्या हक्काची लातूर-मुंबई एक्सप्रेस बिदरला पळवणारे "खुब्बा" लातूरकरांच्या समस्येवर बोला?
खुब्बा यांना लातूरात बोलण्याचे अधिकार सुद्धा नाही; आ. देशमुखांवर केलेल्या टीकेनंतर जनतेतून संतप्त प्रतिक्रिया
लातूर / प्रतिनिधी : कुर्डूवाडी ते लातूर हा पूर्वीचा जुना नॅरोगेज मार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित होण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी रोहयोतून पैसे दिले आणि प्राधान्यक्रमाने मार्ग पूर्ण करून घेतला. अनेक वर्षांच्या संघर्षांनंतर लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नामुळे मुंबई-लातूर एक्स्प्रेस २००७ मध्ये सुरू झाली. परंतु बिदरचे तत्कालीन खासदार भगवंत खुब्बा यांनी लातूरची रेल्वे बिदरपर्यंत नेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते.
बिदरचे तत्कालीन खासदार भगवंत खुब्बा यांनी मुंबईहून लातूरला येणारी लातूर एक्स्प्रेस सकाळी ७ पासून रात्री साडेदहापर्यंत लातूरच्या यार्डात नुसती उभी असते म्हणून ही गाडी बिदरपर्यंत वाढविण्याची मागणी करत पाठपुरावा केला होता. त्यावेळी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी या विस्तारीकरणाला विरोध दर्शविला होता. लातूर एक्स्प्रेस रेल्वे बचाव संघर्ष समिती स्थापन करून या समितीच्या वतीने आंदोलन छेडत सहय़ांची मोहीम, लातूर बंद व रेल रोको आदी आंदोलन करण्यात आले होते.
लातूरकरांचा विरोध असताना ही प्रशासनाने आठवडय़ातील तीन दिवस लातूरची रेल्वे बिदरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. लातूरकरांनी याला तीव्र विरोध केला. परंतु बिदरचे तत्कालीन खासदार भगवंत खुब्बा यांनी जोरदार प्रयत्न करून लातूरकरांची हक्काची रेल्वे बिदरला पळवली, अश्या चर्चा लातूरात सुरु आहेत.
लातूरची देशात व राज्यात विविध कारणामुळे वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. लातुरात विद्यार्थ्यांच्या यशासाठी सुरु केलेला ज्ञानदानाचा अग्निकुंड आज देखील सातत्याने सुरु आहे. या शैक्षणिक लातूर पॅटर्नमुळे लातूरची ओळख देशभरात आहे. देशातील तूरडाळ उत्पादनात लातूर जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो. या तूरडाळीला आठ राज्यातून मागणी आहे. सोयाबीन उत्पादनात ही लातूरची कीर्ती देशभरात आहे.
त्यामुळे लातूरहून बसणाऱ्या प्रवाशांची गैरसोय
सामाजिक सलोखा राखणारे शांतताप्रिय लातूर अशीही ओळख आहे. अशावेळी लातूरमध्ये ये-जा करणाऱ्या प्रवाशाची संख्या सुरुवातीपासूनच अधिक आहे. मुंबई -लातूर एक्सप्रेसच्या माध्यमातून अनेक प्रवाशांची सोय होत होती. मुंबई - लातूर एक्सप्रेस गाडीच्या बिदरपर्यंत विस्तारीकरणामुळे खरी अडचण झाली ती प्रवास करणाऱ्या व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य लातूरकरांची. कमी पैशात, कमी वेळेत मुंबईला जाण्याची सोय प्रवाशांची होत होती. बिदरहून येणारे प्रवासीच रेल्वेत खचाखच भरल्यामुळे लातूरहून बसणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.