'एक है तो सेफ है...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला पंतप्रधानांच्या घोषणेचा नेमका अर्थ...!
छत्रपती संभाजीनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतली. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक है तो सेफ है या घोषणेचं समर्थन केलं. ते म्हणाले की, सर्वांनी सोबत राहून मतदान केलं पाहिजे. तोडा-फोडा आणि राज्य करा, हे धोरण अवलंबिणाऱ्या लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे, असा त्या घोषणेचा अर्थ आहे.
घोषणेवरुन आरोप-प्रत्यारोप
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात येत आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात एक है तो सेफ है ही घोषणा दिली होती. तर मुख्यमंत्री योगींनी कटेंगे तो बटेंगे ही घोषणा दिली. या दोन्ही घोषणांवर विरोधकांनी आरोप केले. भाजप जातीयवादी असल्याचा आरोप केला होता. आता या दोन्ही घोषणांबाबत महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा आपले मत मांडले आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री
एक है तो सेफ है या घोषणेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, एक है तो सेफ है या घोषणेचा तुम्ही सर्वांनी चुकीचा अर्थ घेतला. एक राहू सेफ राहू म्हणजे, एकोप्याने राहणे हा गुन्हा आहे का... ब्रिटीशांनी तो़डा-फोडा आणि राज्य करा, असं धोरण अवलंबलं होतं. तिच विचारसरणी आता काँग्रेसने अवलंबिली आहे. तोडा-फोडा आणि सत्ता मिळवा, अशी मविआची विचारधारा आहे. मोदींनी सांगितलं, एक रहा, सोबत रहा, एकत्र होऊन मतदान करा. तुम्ही त्याचा वेगळा अर्थ लावला.
उद्धव ठाकरेंवर केली टिका
एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवरही जोरदार टिका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेलं. त्या लोकांनी कोविड काळातही भ्रष्ट्राचार केला. कोविड सेंटरच्या खिडडीमध्ये आणि डेड बाँडीच्या बँगमध्ये पैसे खाल्ले. मराठवाडा वाँटर ग्रीड प्रकल्प, जलयुक्त शिवार अभियान, समृद्धी महामार्ग, मेट्रो हे प्रकल्प मविआ सरकारच्या काळात बंद पाडण्यात आले. विकास केला तो आम्ही. गेल्या अडीच वर्षात आम्ही महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. ठाकरे सरकार हे खरं तर दरोडेखोर सरकार होतं, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर हल्ला चढवला.