MVA Manifesto : महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, दिल्या 5 गॅरंटी
महिलांना 3 हजार महिना, बेरोजगारांना 4 हजार; 25 लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा
भाजपने आपला जाहीरनामा आज सकाळी प्रसिद्ध केला. त्यानंतर आता महाविकास आघाडी देखील जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
यामध्ये महिला, शेतकरी, युवक शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यवसाय, सामाजिक न्याय या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात 100 दिवसांचा अजेंडा जाहीर केला. महायुतीने आमच्याच योजना कॉपी केल्या, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
काँग्रेसचे पंचसूत्री
कुटुंब रक्षणासाठी विमा – कुटुंबाला 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा.
महालक्ष्मी योजना – महिलांना दर महिन्याला 3 हजार रुपये आणि महिला व मुलींसाठी मोफत बस सेवा.
कृषी समृद्धी – शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन
युवकांना मदत – बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4 हजार रुपयांपर्यंतची मदत.
समानतेची हमी – जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार.
या केल्या घोषणा
- महिलांसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार
- जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या नावे बँक खात्यात रक्कत ठेवणार, 18 वर्षांनंतर 1 लाख देणार
- MPSC चे वेळापत्रक जाहीर करून 45 दिवसांत निकाल लावणार
- महाराष्ट्रात जातीनिहाय जनगनणा करणार
- 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांचे 100 युनिटचे बील माफ करणार
- महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी करणार
- महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला 3 हजार रुपये देणार
- 6 गॅस सिलेंडर प्रत्येकी 500 रुपयांत उपलब्ध करून देणार
- सुशिक्षित बेरोजगारांना 4 हजार रुपयांपर्यंत भत्ता
- महिलांसाठी एसटी बससेवा मोफत
- शेतकऱ्यांचे 3 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन
- 25 लाखांची आरोग्य विमा योजना लागू करणार
- प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 3 लाखांची आर्थिक मदत
- सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
- 25 नगरपालिकांच्या न झालेल्या निवडणुका आमचे सरकार आल्यावर करणार.
- संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना दीड ऐवजी दोन हजार रुपये.
- राज्यातील अडीच लाख सरकारी रिक्त पदे भरणार
- राज्यात सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार
- महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये 2 दिवसांची ऐच्छिक रजा.
- शिवभोजन थाळी योजना केंद्राची संख्या वाढणार
- महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार
- सरकारी रुग्णालयात मोफत औषध उपलब्ध करून देणार
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, महायुतीने आमच्याच योजना कॉपी केल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना केली जाईल. कालपासून तेलंगाणात जातिनिहाय जनगणना सुरू झाली आहे. मोदी म्हणाले विरोधक जातीजाती वाद लावत आहेत. पण ही जातीनिहाय जनगणना जातीजातींमध्ये फूट पाडण्यासाठी गणना नसून, कोणत्या जातीत किती लोक मागासलेले आहे, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आहे.
महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार आहोत. उद्योग आणि रोजगार निर्मितीसाठी नवीन औद्यागिक धोरण आखले जाईल. दादर येथील चैत्यभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधणे ही आमची प्राथमिक पसंती राहील, असेही खरगे म्हणाले.