मोठी बातमी : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी शिवाला पोलिसांनी घेतले ताब्यात
नेपाळमध्ये पळून जाणार होता, तत्पूर्वीच मुंबई गुन्हे शाखा व युपी एसटीएफने उचलले
Baba Siddiqui Murder Case : मुंबईतील बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी, यूपी एसटीएफ आणि मुंबई गुन्हे शाखेने मुख्य आरोपी आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर शिवकुमार उर्फ शिवा याला अटक केली.
नेपाळ सीमेच्या 19 किमी आधी नानपारा येथे अटक केली आहे. त्याचे 4 मदतनीसही पकडले गेले. शिवकुमार नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रताप सिंग यांचा समावेश आहे. हे सर्व बहराइचमधील गंडारा गावचे रहिवासी आहेत. ते शिवकुमारला नेपाळला आश्रय देण्यासाठी आणि पळून जाण्यात मदत करत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या बाबा सिद्दिकींच्या हत्येत शिवाचा हात होता. हत्येनंतर तो फरार झाला होता, तर त्याच्या दोन साथीदारांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. शिवकुमारने चौकशीदरम्यान खुलासा केला की तो भंगार व्यापारी शुभम लोणकर याच्यामार्फत लॉरेन्स गँगसाठी काम करत असे. हत्येसाठी त्याला 10 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हत्येनंतर शिवकुमार मुंबईतून पळून गेला आणि झाशी, लखनौमार्गे बहराइचला पोहोचला आणि नेपाळला पळून जाण्याचा बेत होता.