मतदानाला जाताना 'या' गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला होईल त्रास..!
नवमतदार असल्यास काय काळजी घ्याल, जाणून घ्या सविस्तर....!
Maharashtra Assembly Election 2024 मुंबई : महाराष्ट्रात उद्या अर्थात बुधवारी म्हणजेच २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाची यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.
आता तुम्ही नवमतदार असाल तर, मतदान कसं करायचं, मतदान करताना काय सोबत न्यायचं, बुथवर गेल्यावर काय-काय करावं लागतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात...
RCC New
मतदार यादीत नाव शोधा
तुम्ही नवमतदार असाल तर मतदार यादीत तुमचं नाव, मतदार यादी क्रमांक, मतदार क्रमांक हे सगळं तुम्हाला माहित हवं. मतदार यादीत नाव असेल, तरच तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे, हे पहिल्यांदा समजून घ्या. त्यामुळे मतदार यादीत नाव असल्याची खात्री सर्वप्रथम करुन घ्या.
आता तुम्हाला ही यादी ऑनलाईनही मिळू शकते. तुम्ही अगदी घर बसल्याही तुमचं नाव, मतदान कुठे आहे, कितव्या खोली क्रमांकात आहे, हे सगळं शोधू शकता. मतदान केंद्र शोधण्यासाठी शासनाने https://electoralsearch.eci.gov.in ही वेबसाईट दिली आहे. त्यावर जाऊ शकतात.
मतदानाला जाताना काय घेऊन जावं
तुम्हाला एखाद्या उमेदवाराने किंवा अन्य कोणत्या मार्गाने तुम्ही मिळवलेली फोटो व्होटर स्लिप ही फक्त तुमच्या माहितीसाठी असते. ती दाखवून तुम्हाला मतदान करता येत नाही. मग मतदान करताना तुम्ही काय सोबत न्यायचे असते, ते समजून घ्या. मतदानाला जाताना मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिली जाणारी ओळखपत्रे, बँक किंवा पोस्ट ऑफीसने फोटोसह दिलेले पासबूक, पँनकार्ड, एनपीआर किंवा आरजीआयने देलेल स्मार्टकार्ड, मनरेगाचं जाँबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेलं आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्रासह पेन्शन दस्ताऐवज, आधार कार्ड यापैकी काहीही असेल तरी तुम्हाला मतदान करता येतं. यापैकी काहीतरी एक सोबत न्यावं लागतं.
मतदान कसं कराल?
प्रथम तुमचं मतदान कोणत्या बुथवर आहे, हे तुम्हाला माहिती हवं. त्यानंतर मतदान बुथवर गेल्यावर तुम्हाला मतदान केंद्रात लहान-लहान गटांमध्ये आत सोडलं जाईल. तुमचा नंबर आला की पहिल्या टेबलवर मतदान अधिकारी तुमचे मतदान ओळखपत्र किंवा अन्य कागदपत्रांद्वारे तुमची ओळख तपासून पाहील. त्यानंतर दुसऱ्या टेबलवर दुसरा एक अधिकारी तुमच्या बोटावर लगेच न पुसली जाणारी शाई लावेल. त्यानंतर तिसऱ्या टेबलवर मतदारांच्या रजिस्टरमध्ये तुम्हाला सही करावी लागेल. यानंतर चौथ्या टेबलवर दुसरे मतदान अधिकारी तुम्हाला स्वाक्षरी केलेली मतदार स्लीप देतील. त्यानंतर तिसरा मतदान अधिकारी तुमची मतदार स्लीप घेऊन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच EVMच्या कंट्रोल युनिटवरील 'बॅलट' बटण दाबेल. आता तुम्ही मतदान करायला तयार आहात.
मतदानानंतर हे तपासा
मतदान यंत्रासमोर तुम्हाला कुणालाही न दिसेल अशा चौकानात, उभं रहावं लागतं. तुमचं मशिन मतदान करण्यासाठी तयार केलेलं असतं. तुम्हाला समोरच्या ईव्हिएम मशिनवर सगळ्या उमेदवाराची नावे दिसतील. तुम्हाला ज्या उमेदवाराला मतदान करायचं आहे त्या उमेदवाराचं नाव, त्यापुढे त्याचं चिन्ह हे सगळं खात्री करुन तुम्ही त्या समोरील बटन दाबायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक बीप ऐकू येतो. त्यानंतर शेजारीच असलेल्या व्हिव्हिपॅट मशिनवर तुम्हाला तुम्ही मतदान कुणाला केलं ते दिसतं. आपलं मतदान व बाहेर येणारी स्लिप हे दोन्ही खात्री करुन घ्या.
मतदान केंद्रातून बाहेर पडा
तुमचं मतदान झाल्यावर तुम्हाला लगेच तो बुथ सोडावा लागतो. कारण तुमच्यानंतरच्या मतदाराला त्याच चौकोनात उभे रहायचे असते. मतदान झाल्यावर तुम्ही बुथच्या बाहेर पडा. त्यानंतर तुमच्या मतदान केंद्राच्या बाहेर पडा. हे सगळं करताना तुम्ही इतरांशी जास्त वेळ बोलू शकत नाहीत. कारण मतदान केंद्रावरील सुरक्षा यंत्रणा या सगळ्या गोष्टींना प्रतिबंध घालत असते.