शरद पवारांना महाराष्ट्राचा चेहरा स्वत:च्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?
रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर खोचक टीका
मुंबई : सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली.
शरद पवार सध्या महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची भाषा करत आहेत. पण, त्यांना महाराष्ट्राचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का? हा माझा प्रश्न आहे, असे म्हणत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
शरद पवारांनी बॅंका हाणल्या
शरद पवारांनी बँका हाणल्या- कारखाना हाणल्या, पण तरीही ते आपल्या भाषणात आपली महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची इच्छा असल्याचे सांगतात. अरे कसा चेहरा बदलता... महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार आहात का? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलताना म्हणाले.
चिल्लापिल्ल्यांचे कसे होणार ही पवारांना चिंता
शरद पवार, उद्धव ठाकरे व हे काँग्रेसवाले देवेंद्र फडणवीस यांना मुद्दाम घेरत आहेत. आपण शेतकरी माणसे आहोत. आपल्याकडे गाय आहे. राज्याची तिजोरी म्हणजे ही गायच आहे. देवेंद्र फडणवीस यांना या गायीचे सर्व दुध तिच्या वासरांना द्यायचे आहे. पण विरोधकांचा त्याला विरोध आहे. विशेषतः शरद पवारांना यामुळे आता आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांचे कसे होणार? ही चिंता लागली आहे, असेही सदाभाऊ खोत यावेळी बोलताना म्हणाले.
पडळकर महाराष्ट्राची मुलुखमैदानी तोफ
देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राची मुलुखमैदानी तोफ असल्याचे ठणकावून सांगितले. ते म्हणाले, गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राची मुलूख मैदानी तोफ आहेत. इतर लोकांसाठी जत मतदारसंघ शेवटचा असेल, पण माझ्यासाठी हा एक नंबरचा मतदारसंघ आहे. कारण, जत हे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे. त्यातच गोपीचंद येथून निवडणूक लढवत आहे.
विरोधकांनी जतचा दुष्काळ दूर करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे आम्ही येथील 64 गावातील दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरुपी संपवण्याचा निश्चय केला आहे. भविष्यात या गावांमध्ये बागायती शेती होईल. मी मुख्यमंत्री होण्यापूर्वी येथील सिंचन योजना बंद होत्या.
पण आम्ही टेंभू उपसा सिंचन योजनेला सुमारे 7 हजार 370 कोटींचा निधी दिला. त्यातून सांगली जिल्ह्यातील 2 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आली. आता आम्ही उपसा सिंचन योजनांना सौरऊर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यापुढे वीजेचे बिलही भरावे लागणार नाही, असे फडणवीस म्हणाले.