भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. थेट भाजपचा बडा नेता पैसे वाटप करत असल्याचे पाहून मला तर आश्चर्यच वाटत आहे. आता या निवडणुकीतील भाजपचा खेळ खल्लास झाला आहे, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला.
RCC New
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार थांबला आता राजकीय पक्षांनी मतदारांच्या गुप्त भेटीगाठी व बैठकांवर जोर दिला आहे. त्यातच बहुजन विकास आघाडीने (बविआ) भाजपचे बडे नेते विनोद तावडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
जे घडले ते कॅमेऱ्यापुढे, लपवून ठेवण्याचे काम नाही
संजय राऊत म्हणाले- कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी नालासोपारा विरारमध्ये जे घडले, ते कॅमेऱ्यापुढे आहे. या प्रकरणी खुलासे कशाचे होत आहेत? भाजपचा खरा चेहरा उघड झाला. त्यांचा या निवडणुकीतील खेळ संपला. विनोद तावडे हे भाजपचे सरचिटणीस आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस यांच्याकडे तब्बल 5 कोटी रुपये सापडलेत. बहजुन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे पैसे जप्त केलेत. पैसे तोंडावर फेकले तोंडावर व गोंधळ घालून विनोद तावडे यांना तिथे कोंडून ठेवले. यावर कोणता खुलासा करणार हे भाजपने सांगावे.
पोलिस बंदोबस्तात पैसा वाटप
महाराष्ट्राच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात आचारसंहिता लागण्यापूर्वी किमान 15 ते 20 कोटी रुपये पोहोचले. आता आज नाशिकमध्ये भाजप व शिंदे गटाचे पैसे पकडले. मुंबईत पैसे वाटण्यासाठी ठाण्यातून खास माणसे नियुक्त करण्यात आली आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
तावडेंचा गेम केला
विनोद तावडे यासंबंधीची माहिती भाजपच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना दिली. विनोद तावडे भविष्यात आपल्याला जड होतील. ते बहुजन समाजाचा चेहरा आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. त्यांच्या हातात या राज्याची काही सूत्रे आहेत. ते मोदी व शहांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने पकडून देण्याचे कारस्थान भाजपमध्ये रचले गेले. ज्यांच्याकडे गृह खाते आहे त्यांच्याकडे यासंबंधीची जास्त माहिती असते, असेही संजय राऊत म्हणाले तर त्यांनी थेट फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.