भाजपने हल्ली डॉग स्कॉड बाळगलेले दिसतात; जयंत पाटलांचा खोचक टोला
त्यांना प्रायश्चित करावेच लागेल, सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर प्रदेशाध्यक्षांचे प्रत्युत्तर
Jayant Patil on Sadabhau Khot over Sharad Pawar criticism : महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीकेची झोड उठली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील आता सदभाऊ खोत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने डॉग स्क्वॉड बाळगले आहे, अशी टीका जयंत पाटलांनी केली आहे.
जयंत पाटील सदभाऊ खोत यांच्या वादग्रस्त विधानावर टीका करताना म्हणाले, ही दुर्दैवी घटना आहे. अशी माणसे भाजपने बाळगली आहेत. डॉग स्क्वॉड बाळगले आहेत. या प्रकाराला देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन आहे का? असा सवाल उपस्थित करत याचा खुलासा करण्याचे आव्हान जयंत पाटलांनी केले आहे.
तसेच सदाभाऊ खोत यांनी असे वक्तव्य केले आहे याचे प्रायश्चित्त करावे लागेल. भाजपमधील काही लोक शरद पवार साहेबांवर खालच्या पातळीवर टीका करतात आणि आमदारकी मिळवत असतील तर भाजपचा विचार त्यांना लखलाभ, असे जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, सदभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर सदभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सदभाऊ खोत म्हणाले, मी बोललेली भाषा ही गावगड्याची भाषा आहे. कोणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नव्हता. परंतु काही लोकांनी त्या शब्दांचा विपर्यास केला. त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते शब्द मी मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो.
पुढे बोलताना सदभाऊ खोत म्हणाले, एखादी व्यक्ती आभाळाकडे बघून बोलत असेल तर आम्ही त्याला आरशात बघ असं म्हणतो. गावगाड्याची भाषा समजायला मातीमध्ये रुजावं लागतं. मातीमध्ये राबावं लागतं. मातीमध्येच मरावं लागतं. त्यानंतरच गावाकडची आणि मातीची भाषा समजते.
नेमके काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?
शरद पवारांवर टीका करताना सदभाऊ खोत म्हणाले, शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाने हाणले, पण एवढे हाणले तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. अरे कसला चेहरा, महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली होती.