विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार
निवडणूक आयोगाने रश्मी शुक्लांची केली बदली; मविआच्या नेत्यांनी केली होती तक्रार
मुंबई : निवडणूक आयोगाच्या आदेशांनंतर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आल्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. ते पुढील आदेश येईपर्यंत या पदाचा कारभार पाहतील.
निवडणूक आयोगाने सोमवारी सकाळी काँग्रेस व इतर पक्षांच्या तक्रारींवर कारवाई करत महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तत्काळ प्रभावाने बदली करण्याचे आदेश दिले होते. तसेच राज्याच्या मुख्य सचिवांना रश्मी शुक्ला यांचा पदभार तत्काळ सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, रश्मी शुक्ला यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
आयोगाने 3 अधिकाऱ्यांची मागितली नावे
निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली केल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्ती करण्यासाठी सेवाज्येष्ठतेनुसार 3 अधिकाऱ्यांची नावे मागितली आहेत. ही नावे मुख्य सचिवांना 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत द्यावयाची आहेत. सरकार मुख्य सचिव यासंबंधी कोणत्या अधिकाऱ्यांची शिफारस करणार? हे कळले नाही. पण पोलिस महासंचालक पदाच्या शर्यतीत संजय वर्मा (डीजी कायदा व तंत्रज्ञान), रितेश कुमार (डीजी होमगार्ड) व संजीवकुमार सिंघल (डीजी एसीबी) हे 3 अधिकारी असल्याची माहिती आहे. पण त्याची पुष्टी झाली नाही.
फणसाळकर 1989 च्या बॅचचे अधिकारी
विवेक फणसाळकर हे भारतीय पोलिस सेवेच्या 1989 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते सध्या मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. फणसाळकर हे पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. ते मुंबई पोलिस दलातील सुमारे 50 हजार पोलिसांचे नेतृ्त्व करतात. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम केले आहे. तत्पूर्वी, ते ठाण्याचे पोलिस आयुक्त होते. त्यांनी जवळपास पावणेदोन वर्षे ठाणे शहर आयुक्तपदाचा कारभार सांभाळला होता. कोरोना महामारीच्या काळात आपले प्राण संकटात टाकून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला होता.