मी कालच्या विषयावर पडदा टाकलाय; कोल्हापुरातील नाट्यमय घडामोडीनंतर सतेज पाटील बॅक फूटवर
स्मित हास्य करत माध्यमांना म्हणाले- मला शाहू महाराजांचा आदरच, त्यांना विचारून पुढचा निर्णय घेऊ
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात सोमवारी अभुतपूर्व राजकीय नाट्य पाहायला मिळाले होते. याठिकाणी मविआ आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. हा सतेज पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
यानंतर सतेज पाटील प्रचंड संतापले होते. तर संध्याकाळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. त्यामुळे कालचा दिवस कोल्हापूरच्या राजकारणासाठी काही भावूक ठरला होता.
मात्र, मंगळवारी सकाळी सतेज पाटील पुन्हा एकदा चेहऱ्यावर नेहमीचं हास्य धारण करत प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. यावेळी त्यांनी कालच्या प्रकाराविषयी मला काहीही बोलायचे नाही. मी आता इथून पुढे काय करता येईल, या गोष्टींविषयी चर्चा करणार असल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले सतेज पाटील?
सतेज पाटील म्हणाले की, मी कालच्या विषयावर पडदा टाकला आहे. जे घडलंय त्यावर बोलण्यात अर्थ नाही. आता इथून पुढे कसं जावं, याबाबत मी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे. काल जे घडलंय त्यावर बोलण्यात अर्थ नाही. इंडिया आघाडीचे घटकपक्ष लोकसभा निवडणुकीत एकत्र होते, त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. आता विधानसभेलाही घटकपक्षांनी मदत करावी, ही अपेक्षा आहे. आम्ही आता एकमेकांशी बोलून पुढील दिशा निश्चित करु, असे सतेज पाटील यांनी सांगितले.
मधुरिमाराजे यांच्या उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयाविषयी बोलण्यास सतेज पाटील यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी म्हटले की, आता मला कुठलाही वाद निर्माण करायचा नाही. आता पुढे जाणं, हाच एकमेव मार्ग आहे. सगळ्या गोष्टी घडून गेल्यात त्यावर मी आता बोलणे सयुक्तिक नाही. आम्ही आज संध्याकाळपर्यंत कोल्हापूर उत्तरमधील आमची भूमिका स्पष्ट करु.
शाहू महाराजांशी बोलून निर्णय घेणार
मी काल गारगोटीवरुन येताना शाहू महाराजांशीही चर्चा केली आहे. मला आता कोणावरही वैयक्तिक टीकाटिप्पणी करायची नाही. घडून गेलेल्या घटनेबाबत बोलून वाद निर्माण करण्यात अर्थ नाही. मला शाहू महाराजांबद्दल आदर आहे. छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवणे, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. मी आता कोणावरही टीका करणार नाही. मला पुढील 15 दिवस सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. सगळ्यांना सोबत घेणं, ही माझी जबाबदारी आहे. मी आज शाहू महाराज आणि इतरांशी बोलून कोल्हापूर उत्तरमध्ये काय करायचे, याबद्दल निर्णय घेईन, असे सतेज पाटील यांनी सांगितले.