उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हेंची अधिकाऱ्यांनी बॅग तपासली, video व्हायरल
ठाकरे संतापले- मोदी शहांचीही तपासण्याचे घाडस दाखवा?; कोल्हे म्हणाले- कायदा सर्वांनाच सारखा आहे का?
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्राचे वातावरण तापलेले आहे. आता अधिकाऱ्यांनी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची झाडाझडती घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
उद्धव ठाकरे यांनी स्वतः या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यावर ठाकरे संतापले आहे. दुसरीकडे या घटनेच्या काही काळानंतर आता शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची देखील बॅग निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासली आहे. या घटनेचा देखील व्हिडिओ समोर आला आहे.
ठाकरेंनी व्हिडिओ केला शेअर?
आज यवतमाळच्या वणी मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे हेलीपॅड आल्यानंतर निवडणूक विभागाच्या भरारी पथकांकडून हेलिकॉप्टरची आणि साहित्याची तपासणी करण्यात आली. याचा व्हिडिओ स्वतः उद्धव ठाकरे यांनी शूट केला. या ठाकरे म्हणाले की, माझी बॅग तपासता त्याला माझा विरोध नाही. पण, अशीच हिंमत मोदी-शहा यांची बॅग तपासण्यात देखील दाखवा अन् त्याचा व्हिडिओ मला पाठवा, असेही आव्हान ठाकरेंनी अधिकाऱ्यांना दिले. तर व्हिडिओच्या संवादात ठाकरे अधिकाऱ्यांना म्हणाले की, माझी युरीन पॉट देखील एकदा तपासून घ्या.
डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात सगळ्यांना समान न्याय हे आम्ही मानतोच.पण यंत्रणांना हाताशी धरुन लोकशाहीला पायदळी तुडवून हुकुमत गाजविणाऱ्या दिल्लीश्वरांनी मात्र त्या संविधानाचा सगळ्याच पातळ्यांवर अवमान करायचा ठरवलं आहे.
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 11, 2024
आज उद्धवसाहेबांच्या सामानाची वणी येथे काही… pic.twitter.com/XyM53sKOsy
सांगलीत कोल्हेंसोबत काय घडलं?
निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणं विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये म्हणून आयोगाचे कर्मचारी कार्यरत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्य बॅग आणि हेलिकॉप्टरची तपासणी वणीमध्ये करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडीओ पोस्ट करुन त्यांच्या बॅगा देखील तपासण्यात आल्याची माहिती दिली आहे.यावेळी अमोल कोल्हे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अमोल कोल्हे यांनी सांगलीतील विटा येथील सभेत बोलताना याबाबत माहिती दिली.
कायदा आहे तर तो सर्वांनाच असावा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे. ते म्हणाले,"आज पुन्हा बॅग तपासली गेली, विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांचीही तपासणी झाली. नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे !" . विशेष बाब म्हणजे अमोल कोल्हे यांनी या पोस्टच्यमाध्यमातून दुसऱ्यांदा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याची माहिती दिली.