राजेसाहेब देशमुख म्हणाले- मी आमदार झाल्यावर तरुणाचं लग्न जुळवून देतो
तुमच्या माजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं तरी लग्न झालंय का?- धनंजय मुंडेंचा पलटवार
बीड : परळी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मी आमदार म्हणून निवडून आलो तर मतदारसंघातील सर्व पोरांचे लग्न लावून देईल, असं आश्वासन त्यांनी भाषण करताना दिलं होतं.
त्यांचं, हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. आता, देशमुख यांच्या विरोधात उभा असलेल्या मंत्री धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलंय. ज्या पक्षात तुम्ही होता त्याच पक्षातील राष्ट्रीय नेत्याचं अद्याप लग्न लागलेलं नाही, असा टोला धनंजय मुंडे यांनी प्रतिस्पर्धी देशमुखांना लगावला आहे.
बीडमध्ये कशी आहे लढत?
राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात यंदा चांगलीच चूरस पाहायला मिळत आहे. कारण, गतवेळेसचे विरोधक मुंडे बहिण भाऊ एकत्रितपणे ही निवडणूक लढवत असून राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या राजेसाहेब देशमुख यांचे आवाहन धनंजय मुंडेंपुढे आहे.
बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पॅटर्नचा परिणाम दिसून आला. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जातीय समीकरणाचा आणि जरांगेंचा किती इम्पॅक्ट होतो हे पाहावे लागणार आहे.
परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राजसाहेब देशमुख आणि अजित पवार गटातून महायुतीचे उमेदवार म्हणून धनंजय मुंडे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. जसजशी निवडणूक जवळ येतेय तशी प्रचारातील रंगत वाढू लागली आहे. राजेसाहेब देशमुख आधी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत.
दरम्यान, देशमुख यांनी केलेल्या विधानाला धनंजय मुंडे यांनी उत्तर देत लग्न हा प्रचाराचा मुद्दा असू शकतो का असा सवाल उपस्थित केला. तर, ज्या पक्षात तुम्ही आहात त्याच पक्षातील राष्ट्रीय नेत्याचं अद्याप लग्न लागलं नाही, असं म्हणत थेट राहुल गांधी यांनाच लक्ष केलं. त्यामुळे, परळीतील उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी घेतलेला मुद्दा राज्यभर चर्चेत आला आहे.
काय म्हणाले होते साहेबराव देशमुख
परळीत आपल्या प्रचाराचा शुभारंभ करताना शरद पवार गटाचे परळीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी अजब आश्वासनं देत मतदारांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ते म्हणाले, तरुण पोरांना लग्नासाठी विचारताना लोक विचारतात, पोराला नोकरी आहे का विचारतात. सरकारच देत नाही तर कशी लागणार..काही उद्योगधंदा आहे का? पालकमंत्र्याचाच उद्योगधंदा नाही तर पोरांचा कसा असेल. यामुळं सगळ्या पोरांचं लग्न होणं अवघड झालंय. त्यामुळं सगळ्या पोरांना मी आश्वासन देतो, जर मी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देऊ असं अजब आश्वासन राजेसाहेब देशमुख यांनी केलंय.