राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना थेट सवाल; म्हणाले- पाडापाडी करायची तर करा
पण जरांगेंना प्रश्न आहे की, मराठा समाजाला आरक्षण कसे मिळणार याचा विचार करा
लातूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंच्या भूमिकवर भाष्य केले आहे. मनोज जरांगेंना निवडणुका लढवायच्या असेल तर लढवा, पाडापाडी करायची असेल, तर ती करा. पण, तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार कसे आहात, येवढे मला फक्त सांगा, असा सवाल राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना केला आहे.
राज ठाकरे आज लातूरमधील रेणापूर येथे जाहीर सभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा महायुती व महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला.
जरांगेंच्या भूमिकेवर राज ठाकरेंचे भाष्य
मनोज जरांगे यांनी सुरुवातील निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतर त्यांनी समाजबांधव आणि इतरांशी चर्चा झाल्यानंतर निवडणूक लढवणार नसून उमेदवार पाडणार असल्याचे भूमिका जाहीर केली. मनोज जरांगे यांच्या याच भूमिकेवर राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
...पण तुम्ही हे आरक्षण देणार कसे, ते मला सांगा
राज ठाकरे म्हणाले की, मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले. त्यानंतर विधानसभा निवडणुका लढवण्याचे त्यांनी जाहीर केले. मग काही दिवसांनी निवडणूक लढवणार नाही, पाडापाडी करणार, अशी भूमिका घेतली. तुम्हाला निवडणुका लढवायच्या असेल तर लढवा, पाडायचे असेल तर पाडा, पण प्रश्न इतकाच आहे की, हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, येवढे मला फक्त सांगा...असे राज ठाकरे म्हणालेत.
कोणतेच राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही
मनोज जरांगे पाटील यांना मी भेटायला गेलो होतो, तेव्हा त्यांना सगळी सत्य परिस्थिती सांगितली होती. हा टेक्निकल विषय आहे. किचकट आहे. लोकसभेत कायदा बदलावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश घ्यावे लागेल आणि हा फक्त राज्याचा विषय नाही. आरक्षण देणाऱ्यांना विचारा कसे देणार. ते देऊ शकत नाही. कोणतेच राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही. जी गोष्ट घडू शकत नाहीत. भेटू शकत नाहीत, त्यासाठी आपण एकमेकांमध्ये भांडत आहोत, असेही राज ठाकरेंनी सांगितले.
मराठा मोर्चांचे केले कौतुक
राज ठाकरे यांनी यावेळी मराठा समाजबांधवांनी मुंबईत काढलेल्या मोर्चाचेही कौतुक केले. मराठा समाजाचे इतके शिस्तबद्ध मोर्चे आजपर्यंत इतिहासात कधी पाहिले नव्हते, असे राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना राज ठाकरेंनी राजकीय पक्षांनाही सवाल विचारला. आरक्षणासाठी मराठा समाज बांधवांचा मोर्चा मुंबईत आला होता, तेव्हा व्यासपीठावर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे नेते बसले होते. त्यावेळी चारही पक्षांनी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे सांगितले होते. मग अडवले कुणी होते. आतापर्यंत का नाही दिले? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.