ठाकरेंची शिवसेना जातीपातीचे राजकारण करत नाही - शिवसेना नेत्याचा दावा
बारा बलुतेदार महासंघ व एकलव्य संघटनेची बैठक संपन्न
मुंबई : शिवसेनाप्रमुख,हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष असून येथे जातीपातीचे कोणीही राजकरण करत नसल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पाठिंबा दिलेल्या बारा बलुतेदार व एकलव्य संघटनेची दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार, ता. ७ नोव्हेंबर रोजी बैठक संपन्न झाली.
बारा बलुतेदार समाज अनेक जातीजातीत विभागला गेला असला तरीही हा समाज एकत्र आला तर राज्यातील सत्ता नक्कीच परिवर्तन होईल. शिवसेनेलाही बारा बलुतेदार समाजाची गरज असून फक्त संख्येला महत्त्व देणाऱ्या आताच्या सरकारला धडा शिकवायचा आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्याने शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून येईल असा आशावाद व्यक्त करत बारा बलुतेदार समाज शिवसेनेच्या नक्कीच पाठीशी राहिलं, असा विश्वास दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यात सत्ता परिवर्तन होऊन महाविकास आघाडीचे शासन आल्यास बारा बलुतेदार समाजाच्या विकासासाठी विकासात्मक धोरण तयार करण्यात येईल. गोरगरीब जनतेच्या उन्नतीसाठी तसेच बारा बलुतेदार समाजातील मुला - मुलींच्या शिक्षण आणि रोजगारासाठी विविध योजना राबविल्या जातील. शिवसेना राजकारणात जनतेला दिलेल्या शब्दांना प्रचंड महत्व देणाऱ्या पक्ष असून बारा बलुतेदार समाजाच्या सर्व मागण्या पुर्ण केल्या जाईल, असे आश्वासन अंबादास दानवे यांनी दिले.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा बारा बलुतेदार समाज स्वाभिमान जपणारा आहे. मोठ्या अपेक्षेने सर्व बारा बलुतेदार समाज उद्धव ठाकरे यांच्याकडे बघत असून त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे,आश्वासन महासंघ अध्यक्ष कल्याण दळे यांनी या बैठकीदरम्यान दिले.
बारा बलुतेदार समाजाला न्याय आणि राजकीय प्रतिनिधित्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.पक्षाकडून उमेदवारी दिलेल्या उमेदवाराची जात न बघता संघटनेवर प्रेम करणाऱ्या व जनसामान्याच्या प्रश्नाची आस्था असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी आमदार व मंत्री केले. बाळासाहेबांच्या याच विचाराचा सन्मान करून बारा बलुतेदार समाजाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला असल्याचे, संघटनेचे शिवाजीराव ढवळे यांनी जाहिर केले.
याप्रसंगी शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले,महासंघ अध्यक्ष कल्याण दळे,शिवाजीराव ढवळे,प्रभारी जिल्हाप्रमुख त्र्यंबक तुपे,माजी महापौर नंदकुमार घोडेले, राज्य उपाध्यक्ष धनजय शिंगाडे, सचिव चंद्रकांत गवळी, सह सचिव सतिश कसबे, बलभीम वाघमारे, सिध्दार्थ बनसोडे, दुर्गा भाटी व मोठया संख्येने संघटनेचे सदस्य उपस्थित होते.