मोदी-शहांनी महाराष्ट्र लुटला; अन् आता मत मागत फिरत आहेत - उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
लोहा-कंधार येथील सभेत ठाकरेंची तोफ धडाडली; म्हणाले- पंधराशे देऊन महिलांची प्रगती थांबवली
नांदेड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तिखट हल्ला चढवला. नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी अवघा महाराष्ट्र लुटला. त्यानंतर आता ते महाराष्ट्रात मते मागण्यासाठी जागोजागी फिरत आहेत. मुलगी शिकली, प्रगती झाली आणि पंधराशे देऊन घरी बसवली, हा विकास आहे का? असा खोचक टोला देखील उद्धव ठाकरे यांनी महायुतींच्या नेत्यांना लगावला.
उद्धव ठाकरे यांची शनिवारी नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप महायुतीवर विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तिखट टीका केली.
या लोकांनी महाराष्ट्राचे उद्योग लुटून नेले
ते म्हणाले, नरेंद्र मोदी व अमित शहांना आता महाराष्ट्राची आठवण झाली आहे. आतापर्यंत त्यांना महाराष्ट्र केवळ लुटण्यासाठी आहे असे वाटत होते. पण आता महाराष्ट्रातील लोकांना मतदानाचा अधिकार आहे हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यानुसार आता ते इथे येऊन मतांचा जोगवा मागत आहेत. या लोकांनी महाराष्ट्राचे सर्व उद्योग लुटून गुजरातला नेता आणि आता निर्लज्जपणे महाराष्ट्राची मते मागता? तुम्हाला काय वाटते? तुम्ही काही केले तरी चालले आणि महाराष्ट्र केविलवाणेपणाने मत देईल? ही लढाई केवळ उद्धव ठाकरे व शिवसेनेची नाही. आपल्याला सत्ता पाहिजे. पण हे सर्व केवळ महाविकास आघाडीसाठी नाही तर येथील सर्वसामान्य जनतेसाठी आपल्याला सत्ता हवी आहे.
बोटे छाटलेल्या कार्यकर्त्याचा बदला घेणार
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपने आता बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला आहे. कोण कापणारे आहेत? जे काही कापणारे आहेत ते तुमच्यासोबत सत्तेत बसलेले आहेत. त्यांनी माझ्या एका कार्यकर्त्याचे केवळ फेसबुक पोस्ट टाकली म्हणून बोटे कापली. ज्यांनी माझ्या कार्यकर्त्याची बोटे कापली, त्यांना आम्ही आता राजकारणात कापणार आहोत, असे उद्धव ठाकरे यावेळी माजी खासदार तथा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना इशारा देत म्हणाले. चिखलीकर यांच्यावर ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याची बोटे छाटल्याचा आरोप आहे.
मोदी येथे आले तर त्यांना हा माझा बोटे कापलेला कार्यकर्ता दाखवा. त्यांना विचारा कोण आहे हा? काय त्याचा गुन्हा? विरोधात पोस्ट टाकली म्हणून त्याचे बोटे छाटता? त्याने तर पोस्ट टाकली, मी तर तुमच्याविरोधात उघडपणे बोलत आहे, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोटे छाटलेल्या पीडित कार्यकर्त्याला आपल्याजवळ बोलावले. तसेच त्याला त्याच्यावर बेतलेल्या प्रसंगाचा बदला मी स्वतः घेणार, असा धीरवजा शब्द त्याला दिला.
मोदी - शहांची भाजपवरील कमान सुटली
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आतापर्यंत भाजपवर मोदी व शहांची पोलादी पकड होती. पण आता त्यांची सर्वत्र छी - थू होत आहे. त्यांचे अनेक नेते आता या दोघांचे काहीही चालत नाही म्हणून भाजप सोडून जात आहेत. सर्वजण आमच्या हातातील मशालीच्या प्रकाशात येत आहेत. आमच्याकडे मशालीचा प्रकाश, तर भाजपमध्ये केवळ काळा अंधार पसरला आहे.
मी मुख्यमंत्री होतो तर यांची हिंमत नव्हती
मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील एकही उद्योग का गुजरातला गेला नाही. भाजपच नव्हे तर मोदी - शहांचीही महाराष्ट्राकडे वाकडे पाहण्याची हिंमत नव्हती. कोरोना काळातही आम्ही हिंमतीने महाराष्ट्राचे उद्योग वाढवले. पण हे डोळ्यात सलत असल्यामुळे त्यांनी आमचे सरकार पाडले. त्यानंतर येथील सर्व उद्योग गुजरातला पळवले. आता ते आमच्यावर विकासाला खिळ घालण्याचा आरोप केला आहे. खरे तर त्यांनीच आमच्या तरुणांच्या रोजगाराला खिळ घालण्याचे काम केले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जय शहांनी कधी क्रिकेट खेळलं का?
अमित शहा यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा अगोदर जय शहा यांना क्रिकेटच्या बोर्डावरून खाली उतरवावे. जय शाह यांनी काय विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे का? सर्वात जास्त विकेट त्यांनी काढल्या आहेत का? जय शहाचे कर्तृत्व काय? त्यांच्यापेक्षा आमच्या गावाकडचा एखादा मुलगा जास्त चांगले क्रिकेट खेळतो.