शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार; म्हणाले - नवी पिढी समोर येतेय, आता कुठं तरी थांबलं पाहिजे
एकाच राज्याचे काम करत असाल तर पंतप्रधान कशाला झालात?- नरेंद्र मोदींवरही पवारांचा निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत दिलेत. आतापर्यंत मी 14 निवडणुका लढल्या. आणखी किती लढवायच्या? कुठेतरी थांबले पाहिजे. नवी पिढी समोर यावी हे सूत्र हाती घेऊन मी आता कामाला लागलो आहे, असे ते बारामती येथे आयोजित एका प्रचारसभेत बोलताना म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे ते सक्रिय राजकारणातून संन्यास घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शरद पवार सध्या आपले नातू तथा बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी प्रचारसभा घेत आहेत. त्यांनी मंगळवारी एका प्रचारसभेला संबोधित करताना संसदीय राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत दिलेत.
ते म्हणाले, मी सध्या सरकारमध्ये नाही. माझ्या राज्यसभेचे अजून दीड वर्षे शिल्लक आहेत. त्यानंतर पुन्हा राज्यसभेवर जायचे की नाही याचा मला विचार करावा लागेल. मी आता लोकसभाच नाही तर कोणतीही निवडणूक लढवणार नाही. किती निवडणुका लढवायच्या. आतापर्यंत 14 निवडणुका लढल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवले नाही.
नवी पिढी तयार करण्याची गरज
दरवेळी तुम्ही मला निवडून दिले. पण आता कुठेतरी थांबले पाहिजे. नवी पिढी समोर यावी हे सूत्र हाती घेऊन आता मी कामाला लागलो आहे. पण याचा अर्थ मी समाजकारण सोडले असा नाही. सत्ता नको, पण लोकांची सेवा, लोकांचे काम करतच राहायचे. ज्या भागात दलित, भटके विमुक्त, उपेक्षित या वर्गासाठी काही करता येईल ते करायचे हा माझा स्वतःचा निर्णय आहे. आता आपल्याला निवडूक नको हे मी ठरवले आहे. पण असे असले तरी राज्य व्यवस्थित चालावे यासाठी नवी पिढी तयार करायला पाहिजे.
पुढल्या 30 वर्षांची व्यवस्था करण्याची गरज
मी 30 वर्षांपूर्वी लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतला. कारण, 30-35 वर्षे सतत निवडून गेल्यानंतर नवी पिढी तयार करण्याची गरज असते. त्यानुसार मी इथली सर्व जबाबदारी अजित पवारांकडे सोपवली. मागील 25-30 वर्षांपासून ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. पहिली 30 वर्षे माझ्यावर आणि त्यानंतरची 30 वर्षे अजित पवारांवर. आता पुढल्या 30 वर्षांची व्यवस्था करण्याची गरज आहे. ती करायची असेल तर लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यात लक्ष घालण्याची दृष्टी हवी, असे म्हणत शरद पवार यांनी यावेळी बारामतीची सर्व सूत्रे युगेंद्र पवार यांच्या हातात सोपवल्याचे सप्ष्ट केले.
युगेंद्र भक्कमपणे बारामतीचे प्रश्न सोडवेल
शरद पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, बारामती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने युगेंद्र पवार यांना पाठिंबा दिला आहे. हे एक नवीन नेतृत्व आहे. त्यांना तुम्ही साथ दिली पाहिजे. काही लोक माझ्यावर भावनेचे राजकारण करण्याचा आरोप करतात. पण मला तसे काहीच करण्याची गरज नाही. मी माझ्या लोकांना ओळखतो. उद्याच्या निवडणुकीत आपण आपले प्रश्न सोडवूया. आता मला आमदारकी नको, खासदारकीही नको, मला केवळ लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. उद्या आपल्या विचारांचे सरकार राज्यात आले तर युगेंद्र भक्कमपणे बारामतीचे प्रश्न सोडवेल.
केंद्र व राज्य सरकारवर टीका
शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. तुम्हाला केवळ एकाच राज्याचे काम करायचे असेल तर पंतप्रधान झाले कशाला? तिथे जाऊन मुख्यमंत्री व्हा. माझी कोणतीही तक्रार नाही. पण जे काही घडत आहे ते राज्य किंवा देशाच्या हिताचे नाही. ही स्थिती बदलायची असेल तर सत्ता परिवर्तनाशिवाय गत्यंतर नाही. शेतीला पाणी व हाताला काम यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने दिल्ली व राज्यातील राज्यकर्ते त्यावर काम करताना दिसत नाहीत, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, शरद पवार गटाचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी शरद पवार सक्रिय राजकारणातून संन्यास घेणार असल्याचे वृत्त फेटाळले आहे. शरद पवार यांच्या विधानाचा विपर्यास केला जात आहे. त्यांनी राजकीय संन्यास घेण्यासंबंधीचे कोणतेही विधान केले नाही, असे ते म्हणालेत.