ठाकरेंना संभाजीनगरमध्ये धक्का:माजी महापौर नंदकुमार घोडेले अन् अनिता घोडेले शिंदेंच्या शिवसेनेत दाखल
माजी खासदार चंद्रकांत खैरेंचे होते अत्यंत विश्वासू, आज अचानक मुंबई गाठून केला पक्षप्रवेश
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शहराचे माजी महापौर, माजी खासदार व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नंदकुमार घोडेले आणि माजी महापौर अनिता घोडेले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकही लोकप्रतिनिधी नसणाऱ्या उद्धवसेनेला मनपा निवडणुकीच्या आधी मोठा धक्का बसला आहे. घोडेले हे उद्धवसेनेतील प्रमुख नेते अशी त्यांची ओळख आहे.
घोडेलेंना संघटनेत मोठी जबाबदारी मिळणार
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे पक्षांतर उद्धवसेनेसाठी धक्कादायक मानले जात आहे. शिंदेसेनेत त्यांना संघटनेमध्ये मोठे पद व त्याशिवाय मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे. ही मागणी मान्य झाल्यानेच त्यांनी पक्षात प्रवेश केल्याचे म्हटले आहे.
Sakhi
चंद्रकांत खैरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
नंदकुमार घोडेले हे शिवसेनेचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. ते माजी महापौर देखील राहिले आहेत. तर त्यांच्या पत्नी अनिता घोडेले या देखील महापौर राहिल्या आहेत. घोडेले हे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.
1 तारखेला चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक कार्यक्रमात नंदकुमार घोडेले हे त्यांच्यासोबत दिसून आले. यामुळे आता चंद्रकांत खैरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.