धक्कादायक! HMPV वायरसची आता महाराष्ट्रात देखील एंट्री!!
]HMPV virus in Maharashtra : कालपर्यंत फक्त बेंगळुरू आणि गुजरातमध्ये HMPV विषाणूचे रुग्ण आढळल्याची बातमी होती परंतु आता या नव्या व्हायरसने महाराष्ट्रात देखील शिरकाव केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसनं शिरकाव केल्याने जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे.
आणि आता राज्यातील नागपुरातील दोन मुलांचा एचएमपीव्ही चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागपूर शहरातील रामदासपेठ येथील खासगी रुग्णालयात दोन बालकांना खोकला व ताप आल्याने उपचारासाठी आणण्यात आले होते. 3 जानेवारी रोजी नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात ७ वर्षांचा मुलगा आणि १४ वर्षांच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. आता देशभरात एचएमपीव्हीची एकूण सात प्रकरणे समोर आली आहेत. आता या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, याबाबत आपण एक बैठक बोलावली आहे. हा विषाणू यापूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. फक्त चीनमध्ये त्याची संख्या झपाट्याने वाढल्याने चीनने काळजी घेण्याचे काम केले आहे. आपल्याकडे याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. कोरोनाकाळात रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच आयसोलेशन वॉर्ड उभारण्यात आले होते .यंदाही कोरोना सारखी तयारी केली जात आहे का? असे विचारले असता केंद्र शासनाने कालच निर्देश जारी केलं आहेत.
राज्यातील आरोग्य विभाग त्याच पद्धतीने कामकाज करत आहे. आपली संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आरोग्य विभाग नागरिकांना योग्य त्या सूचना देतील. नागरिकांनी काळजी घ्यावी, घाबरण्याचे काहीही कारण नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आरोग्य विभागाच्या सूचना आज किंवा उद्या जाहीर होतील, असे प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे. आरोग्य विभागाच्या सर्व गाईडलाईन्स तंतोतंत पालन कराव्यात, असेही ते म्हणाले.