चीनमध्ये पसरत असलेला HMPV विषाणू भारतासाठी किती धोकादायक?
भारतात पुन्हा कोविडसारखी स्थिती निर्माण होणार का, जाणून घ्या - आरोग्य विभाग काय म्हणाले?
कोरोना विषाणू पासून पूर्ण जग आता कुठे पूर्णपणे सावरलं होतं त्यातच आता चीनमधील नवीन वायरसने धडकी भरवली आहे. चीनमध्ये सध्या ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस धुमाकूळ घालत आहे. अशात या विषाणूचा भारताला कोणताही धोका नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली आहे.
“चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसचा -HMPV उद्रेक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.देशात असे कोणतेही प्रकरण आढळले नाही. त्यामुळे सध्याच्या चीनमधील परिस्थितीमुळे भारताला काळजी करण्यासारखे काही नाही”, असे आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी म्हटले आहे.
तसेच डॉ. अतुल गोयल म्हणाले की, “चीनमध्ये ह्युमन मेटाप्न्यूमो व्हायरसच्या उद्रेकाबद्दल बातम्या येत आहेत. त्याबद्दल मला अगदी स्पष्टपणे सांगायचे आहे की, मेटाप्न्यूमो व्हायरस हा इतर श्वसन विषाणूंसारखा आहे. सर्दी हे याचे सामान्य लक्षण आहे. माझे नागरिकांना आवाहन आहे की, आपण खोकला आणि सर्दी असणाऱ्यांच्या संपर्कात येणे टाळले पाहिजे. खोकताना आणि शिंकण्यासाठी एक वेगळा रुमाल किंवा टॉवेल वापरा आणि जेव्हा सर्दी किंवा ताप असेल तेव्हा आवश्यक असलेली सामान्य औषधे घ्या. सध्याच्या चीनमधील परिस्थितीमुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.”केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत येणारे नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल देखील श्वसन आणि हंगामी संसर्गाच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याचबरोबर त्यांनी आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थांशीही संपर्क साधल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
Sakhi
कोविड मध्ये गेले होते लाखोंचे बळी
चीनमधील नवीन श्वसन रोगाच्या प्रसारामुळे जगभरात पुन्हा एक कोविड सारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. डिसेंबर २०२० मध्ये मध्य चीनच्या वुहान शहरात कोविडचा पहिला रुग्ण सापडला होता. कोविड महामारीने जगभरातील लाखो लोकांचा बळी घेतला होता. याचबरोबर जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली होती.
जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच एक निवेदन प्रकाशित करत, चीनने HMPV विषाणूबाबत अधिक माहिती पुरवणे त्यांचे नैतिक आणि वैज्ञानिक कर्तव्य असलयाचे म्हटले होते. आरोग्य मंत्रालयाकडून ज्या काही मार्गदर्शिका येतील,त्याचे पालन करणे जरुरी आहे.