'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024' ची घोषणा; मनू भाकर, डी गुकेशसह 4 खेळाडूंना मिळाला सन्मान
34 खेळाडूंना मिळाला अर्जून पुरस्कार, वाचा खेळाडूंच्या नावाची यादी अन् कधी होणार सत्कार सोहळा
Announcement of Khel Ratna and Arjuna Awards : 2 जानेवारी रोजी म्हणजेच गुरुवारी भारत सरकारकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली. यात खेळांच्या विविध स्पर्धांमध्ये देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या खेळाडूंना भारत सरकारने पुरस्कार जाहीर केले आहेत. 4 खेळाडूंना खेलरत्न, 34 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार तर 5 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये विशेष सन्मान समारोह आयोजित केला जाणार असून यात राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार दिला जाईल. यंदा जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये एकाही क्रिकेटरचा समावेश नाही, हे विशेष!
खेलरत्न पुरस्कार सन्मानाचे मानकरी:-
खेलरत्न हा भारत सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोश्रेष्ठ पुरस्कारांपैकी एक आहे. यंदा भारत सरकारकडून दिला जाणारा खेलरत्न पुरस्कार नक्की कोणाला मिळणार याची उत्सुकतात होती. यंदा भारत सरकारकडून खेलरत्न पुरस्कार 4 खेळाडूंना देण्यात येणार असून तो
1. मनु भाकर (शूटिंग),
2. डी गुकेश (बुद्धीबळ)
3. हरमनप्रीत सिंह (हॉकी),
4. प्रविण कुमार (पॅरा ऑलम्पिक गोल्ड मेडलीस्ट) यांना जाहीर करण्यात आलेला आहे.
अर्जुन पुरस्कार 34 खेळाडूंना!
विविध खेळात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिला जातो. यंदा तब्बल 34 खेळाडूंना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून यात ऍथलेटिक्समधील 3, बॉक्सिंगमधील 2, चेस 1, हॉकीतील 5, पॅरा आर्च 1, पॅरा ऍथलेटिक्स 9, पॅरा बॅडमिंटन 4, पॅरा शूटिंग 2, शूटिंग 2, पॅरा जुडो 1, स्क्वाश 1, स्विमिंग 1कुस्ती 1 , पॅरा स्विमिंग 2 खेळाडूंचा समावेश आहे.प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान :
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यात 5 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यात पॅरा शूटिंग प्रशिक्षक सुभाष राणा, नेमबाज प्रशिक्षक दीपाली देशपांडे, हॉकी प्रशिक्षक संदीप सागवान, बॅडमिंटनचे प्रशिक्षक श्री एस मुरलीधरन, फ़ुटबॉल प्रशिक्षक रमांडो अग्नेलो कोलाको यांचा समावेश आहे.
Sakhi
महाराष्ट्रातील चौघे ठरले पुरस्काराचे मानकरी
राष्ट्रीय खेळ पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्राच्या चार खेळाडूंना पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहेत. यात यंदा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला शूटिंगमध्ये कांस्यपदक जिंकवून देणाऱ्या स्वप्निल कुसळे याला भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. स्वप्निल कुसळे हा मूळ कोल्हापूरचा असून तो रेल्वे कर्मचारी देखील आहे. स्वप्निल कुसळेच्या रूपाने महाराष्ट्राला खाशाबा जाधवांनंतर दुसरं ऑलिम्पिक पदक मिळालं होतं.
तर स्वप्निल कुसळे याला नेमबाजीचं प्रशिक्षण देणाऱ्या दिपाली देशपांडे यांना देखील द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सचिन सर्जेराव खिलारी याने देखील पॅरालिम्पिक 2024 मध्ये गोळा फेकीत कांस्य पदकजिंकलं होतं. 40 वर्षानंतर शॉटपुटमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता.
तेव्हा या उल्लेखनीय कामगिरीसाठी सचिन खिलारी याला देखील अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच पॅरा जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांना देखीलअर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या या खेळाडूंनी महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.