राजकारणात खळबळ; कॅनडाच्या पंतप्रधानांचा राजीनामा! जस्टिन ट्रुडो यांनी पक्षाचे नेतेपदही सोडलं
कॅनेडियन पंतप्रधानावर का आली अशी वेळ, कोणाचा होता विरोध, वाचा संपूर्ण स्टोरी
Canada PM Justin Trudeau Resignation : कॅनडात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचसोबत त्यांनी लिबरल पार्टीच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. लिबरल पार्टीच्या खासदारांच्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर त्यांची 10 वर्षांची राजवट संपुष्टात आली आहे. भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री 10 वाजता ट्रुडो यांनी राजीनामा दिल्याचं जाहीर केलं.
10 वर्षांची राजवट संपुष्टात आली
कॅनडामध्ये सरकारविरोधात लोकांमध्ये मोठा असंतोष होता. परिणामी सत्ताधारी लिबरल पार्टीच्या खासदारांचा ट्रुडो यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता. त्याचमुळे ट्रुडो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. याशिवाय त्यांनी कॅनडाच्या अर्थमंत्रिपदाचा आणि लिबरल पार्टीच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला.
काळजीवाहू PM म्हणून काम पाहणार
सत्ताधारी लिबरल पक्षाच्या पुढच्या नेत्याची निवड होईपर्यंत ट्रुडो हे कॅनडाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहतील. कॅनडाच्या संसदेचे अधिवेशन 27 जानेवारीपासून प्रस्तावित होते. पण पंतप्रधानांच्या राजीनाम्यामुळे संसदेचे कामकाज 24 मार्चपर्यंत तहकूब करण्यात येणार आहे. लिबरल पार्टी 24 मार्चपर्यंत आपला नवा नेता निवडणार असल्याची माहिती आहे. कॅनडात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे आता सार्वत्रिक निवडणुका कधी होतील हे स्पष्ट झालेलं नाही.
2015 मध्ये झाले होते पहिल्यांदा पंतप्रधान
सन 2015 मध्ये कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे सरकार पडल्यानंतर लिबरल पार्टीचे जस्टिन ट्रूडो पंतप्रधान झाले. गेली 10 वर्षे पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणारे ट्रूडो सुरुवातीच्या काळात खूप लोकप्रिय होते. मात्र गेल्या काही काळापासून ते टीकाकारांच्या निशाण्यावर आहेत. तसेच लोकांमध्येही त्यांच्याविरोधात असंतोष आहे.