आरोपींना मोक्का लावा, बिनभाड्याच्या खोलीत ठेवा; सरपंच परिषदेतून सुरेश धसांचा हल्लाबोल
सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे, अशीही केली आर्त मागणी
संतोष देशमुखचा गु्न्हा काय होता? गावातील एक दलित वॉचमनला मारहाण होताना तो रोखायला गेला, खंडणी मागणाऱ्यांना विरोध केला म्हणून त्याची निर्घुण हत्या केल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला.
संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना मोक्का लावा, त्यांना बिनभाड्याच्या खोलीत ठेवा अशी मागणी त्यांनी केली. या आरोपींना त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना भेटू देऊ नका, त्यांची तेरे नाम चित्रपटातील सलमान खान सारखी अवस्था झाली पाहिजे असा टोलाही सुरेश धस यांनी लगावला. मुंबईतील सरपंच परिषदेमध्ये सुरेश धस बोलत होते.
कोणताही सरपंच धाडस करणार नाही
गावासाठी चांगलं काम करणाऱ्या संतोष देशमुखची हत्या झाली. तो पुढे जाऊन जिल्हा परिषद सदस्यही झाला असता. पण त्याची निर्घुण हत्या केल्यामुळे कोणताही सरपंच समाजसेवेचं काम करण्यासाठी पुढे येणार नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून संतोष देशमुखच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल याची काळजी घ्यायला पाहिजे असं आवाहन आमदार सुरेश धस यांनी केलं.
काळ गेल्यानंतर काही गोष्टी विसरल्या जातात. पण कितीही काळ गेला तरी संतोष देशमुखला विसरले जाऊ शकते. पण तसं करू नका. शेवटपर्यंत ही गोष्ट मनात ठेवा. देशमुख कुटुंबीयांना कायम पाठिंबा द्या अस आवाहनही सुरेश धस यांनी केलं.
'तेरे नाम' सलमान खान झाला पाहिजे
सुरेश धस म्हणाले की, "या प्रकरणात उज्ज्वल निकम यांना केस कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करतोय. यांना बिनभाड्याच्या खोलीत ठेवलं पाहिजे. जवळचे नातेवाईक, मित्रमंडळ कुणालाही त्यांना भेटता आलं नाही पाहिजे. यांना एकटं पाडू द्या. यांची तेरे नाम चित्रपटातील सलमान खानसारखी अवस्था झाली पाहिजे. हे खुळेच झाले पाहिजेत.
सुरेश धस म्हणाले की, "सरपंचाचा गुन्हा काय होता? एका दलित वॉचमनना मारू नका सांगायला गेला, खंडणी घेऊ नका म्हणाला. त्यामुळेच त्याचा निर्घुण खून करण्यात आला. त्याच्या मारहाणीचं चित्रिकरण करण्यात आलं, व्हिडीओ कॉल करण्यात आला. या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी अनेक गोष्टी करण्यात आल्या. मध्येच सेलिब्रेटी आणण्यात आल्या आणि इतरही प्रकार करण्यात आले. पण या प्रकरणावरून आपलं लक्ष हटू देऊ नका.