साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न, दर्शन रांगेतील भाविकाला थेट आरतीचा मान
नववर्षात शिर्डी संस्थानने घेतला मोठा निर्णय, साईचरणी नक्षीकाम केलेला सुवर्ण हार अर्पण
Shirdi Sai Baba Mandir Big Decison : साईबाबा संस्थानने आज भक्तांना अनोखी भेट दिली आहे. तासनतास रांगेत उभं राहून दर्शन घेत असलेल्या सामान्य साईभक्त जोडीला आजपासून साईबाबांच्या आरतीला अग्रभागी उभं राहण्याचा मान दिला जाणार आहे.
पंढरपूरच्या धर्तीवर घेतलेल्या या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नववर्षाच्या पहील्याच दिवशी साईबाबा संस्थानने सामान्य साईभक्तांना अनोखी भेट दिली आहे. त्यामुळे दररोज होणाऱ्या साई बाबांच्या आरतीला एका भाग्यशाली जोडीला आरतीला पुढे उभं राहण्याचा मान मिळणार आहे.
साईबाबांची माध्यान्ह, धूप आणि शेज आरतीला भाग्यशाली जोडी सर्वात पुढे उभी असणार आहे. आरती सुरू होण्यापुर्वी सामान्य दर्शनरांग थांबवली जाते. यावेळी जी जोडी सर्वात पुढे असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
आज साईबाबांच्या माध्यान्ह आरतीपासून या योजनेची सुरुवात केली गेली. यावेळी झाशी येथील मनिष रजक हे दाम्पत्य पहिले भाग्यशाली ठरले. त्यांना आरतीला अग्रभागी उभं करण्यात आल्याने हे भक्त भारावून गेले होते. दर्शनासाठी तब्बल चार तास हे दाम्पत्य रांगेत होतं आणि रांगेतून आरतीच्या वेळी घाबरत पोहोचल्यानंतर त्यांना जो मान मिळाला त्यानंतर या दाम्पत्याने आपला आनंद बोलून दाखवला.
यापुर्वी फक्त सशुल्क पास धारक, दानशूर भाविक आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींनाच हि संधी मिळत होती. त्यामुळे आरतीसाठी सामान्य भक्ताला समोर उभं राहणं दुरापास्त होतं. मात्र संस्थानने सुरू केलेल्या या अनोख्या योजनेमुळे भाग्यशाली सामान्य साईभक्तालाही साईबाबांची आरती करताना व्हीव्हीआयपीचा दर्जा मिळाला आहे.
Sakhi
साईचरणी आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण हार अर्पण
साईबाबांना 13 लाख 30 हजार रुपये किमतीचा सुवर्ण हार नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्पण करण्यात आला आहे. साईभक्त बबिता टीकू आणि परिवाराकडून साईचरणी हे सुवर्ण दान अर्पण करण्यात आले आहे.
साई मूर्तीला आज हा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण हार परिधान करण्यात आला. साई संस्थानकडून दानशूर साईभक्तांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तर साईबाबांना वर्षाच्या सुरुवातीलाच सुवर्ण दान अर्पण करण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा बंद
त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा बंद 5 जानेवारीपर्यंत बंद करण्यात आली आहे. नाताळातील सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. राज शिष्टाचारासंबंधित अतिमहत्त्वाचे व्यक्ती वगळता इतरांना व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे. केंद्र स्तर, राज्य किंवा जिल्हाधिकारी प्रशासनाकडून लेखी पत्रव्यवहार करणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच व्हीआयपी दर्शन मिळणार आहे.