सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; SITने बैठक घेत नातेवाईकांसह लोकांचीही केली चौकशी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात शासनाने सीआयडीचे आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे.
गुरुवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास केज येथील शासकीय विश्रामगृहावर तेली यांनी पथकातील अधिकारी - कर्मचाऱ्यांची बैठक घेत प्रकरणाविषयी सर्व माहिती जाणून घेत नातेवाईकांसह काही लोकांचीही चौकशी केली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटनेला २२ दिवस लोटले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे तिघे फरार असून त्यांना पकडण्यात अद्यापही यश आलेले नाही.
मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात घोषित केल्यानुसार विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली असून या पथक प्रमुख सीआयडीचे आयपीएस अधिकारी बसवराज तेली हे आहेत.
एसआयटीत या अधिकाऱ्यांचा आहे समावेश
तर सध्याचे तपास अधिकारी सीआयडीचे डीएसपी अनिल गुजर, बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह शिवलाल जोनवाल, फौजदार महेश विघ्ने, केजचे फौजदार आनंद शिंदे, सहायक फौजदार तुळशीराम जगताप, जमादार मनोज वाघ, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे, बाळासाहेब अहंकारे, संतोष गित्ते यांचा एसआयटीत समावेश आहे.
दीड ते रात्री सात वाजेपर्यंत चालली चौकशी
गुरुवारी दुपारी १.३० वाजता केज येथील शासकीय विश्रामगृहावर एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांनी या पथकातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. तर देशमुख यांचे नातेवाईकांसह चौकशीसाठी बोलावलेल्या काही लोकांची चौकशी केली. त्यानंतर रात्री ७ वाजता बसवराज तेली हे शासकीय विश्रामगृहातून बाहेर पडले.
Sakhi
दरम्यान, बीड सरपंच हत्याप्रकरणाशी निगडीत खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड सध्या सीआयडीच्या ताब्यात असून त्याची चौकशी केली जात आहे. बीड खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मीक कराड आणि अजित पवारांबाबत मोठा दावा केला आहे. अजित पवार मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले असता, त्यांच्या ताफ्यात वाल्मीक कराडची देखील गाडी होती, असे सोनवणे म्हणालेत. त्याच गाडीतून त्याने पुण्यात सरेंडर केले, असा दावाही बजरंग सोनवणे यांनी केला.