लातुरात तीन दिवसीय मराठवाडा शैक्षणिक महासंमेलन व प्रदर्शनाचे आयोजन
नवीन पिढीला मिळणार विज्ञान, तंत्रज्ञान कौशल्याधिष्टीत अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शन
Marathwada Educational Conference and Exhibition-2025 लातूर/प्रतिनिधी : मराठवाड्यात प्रथमच लातूर येथे दि. १०, ११ व १२ जानेवारी २०२५ या दरम्यान तीन दिवसीय 'मराठवाडा शैक्षणिक महासंमेलन व प्रदर्शन-२०२५' चे आयोजन करण्यात आल्याची माहिती महासंमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश झुरळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
सदर मराठवाडा शैक्षणिक महासंमेलन व प्रदर्शन माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
लातूरच्या टाऊन हॉल,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय शैक्षणिक महासंमेलनाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात सध्यस्थितीत होणाऱ्या विविध बदलांची माहिती तसेच परिपूर्ण ज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मराठवाडा ही संतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना स्वतः ची एक वेगळी ओळख आहे. या भागाला समृध्दशाली ऐतिहासिक पार्श्वभूमी असून सुंदर अशा भूगोलाची किनार लाभली आहे. त्यातील लातूर हे तर शैक्षणिक तीर्थच आहे.
लातूरच्या शैक्षणिक परंपरेला अनेक शिलालेख व ताम्रपटांतून दुजोरा मिळतो.गेल्या तीन दशकांत 'लातूर पॅटर्न' हा महामंत्र देशभरात दुमदुमतो आहे. लातूरच्या विद्यार्थ्यांनी जगातील अनेक विकसित देशांमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. देशाला आणि जगाला वर्षाकाठी शेकडो डॉक्टर्स व इंजिनिअर्स देणा-या लातूरकडून समाजाच्या विविधांगी अपेक्षा वाढल्या आहेत.
लातूर नगरीत पहिल्यांदाच अशा सोहळ्याचे आयोजन
आता नव्या पिढीला गरज आहे ती विज्ञान, तंत्रज्ञान, सशोधन, गणित, भाषा, कला, क्रिडा, सैनिक शिक्षण तसेच कौशल्याधिष्टीत अभ्यासक्रमांची. रोजगारांच्या नवीन संधीची व तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक यांच्या मार्गदर्शनाची... नेमकी हीच गरज ओळखून "मराठवाडा एज्युकेशन कॉन्क्लेव्ह-२०२५" (मराठवाडा शैक्षणिक महासंमेलन व प्रदर्शन २०२५) चे लातूर नगरीत पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे.
सहभागी शाळांचा होणार गौरव
या महासंमेलनात सहभागी झालेल्या शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच महासंमेलनातील शैक्षणिक सत्रास नोंदणी करुन उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक यांना ऑनलाईन सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या महासंमेलनाचा मराठवाड्यातील शिक्षणप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहनही महासंमेलनाचे अध्यक्ष ओमप्रकाश झुरळे,उपाध्यक्ष विजय सहदेव, सचिव प्रमोद भोयरेकर, कोषाध्यक्ष अमोल चव्हाण, संचालक विवेक सौताडेकर यांनी केले आहे.
शंभर पेक्षा स्टॉल्स व विविध तज्ज्ञांचे मिळणार मार्गदर्शन
या शैक्षणिक महासंमेलनात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व आय. ए. एस. अधिकारी यांच्या प्रेरणादायी व भविष्यवेधी मुलाखती, शैक्षणिक क्षेत्रातील भेडसावणाऱ्या प्रश्नांवर व नोकरीच्या संधी या विषयांवर देशभरातील तज्ज्ञांची व्याख्याने, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, संस्था यांच्यासाठी दिशादर्शक, नाविन्यपूर्ण विविध साहित्य कृतींचे, बदलत्या अत्याधुनिक अद्यावत तंत्रज्ञानाचे, शैक्षणिक साधनांचे १०० पेक्षाही अधिक स्टॉल्स यावेळी लावण्यात येणार आहेत.