'नैतिकतेचा विचार ज्याने त्याने करावा', फडणवीसांचे विश्वासू आमदार अभिमन्यू पवारांचा टोला
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत केले भाष्य
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील तपासाला गती आली असून सीआयडी व एसआयटी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. त्याअनुषंगाने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची चौकशी केली जात आहे. तर, दुसरीकडे विरोधकांकडून बीडचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता, विरोधकांना राजकारण करायचं आहे, त्यांनी राजकारण करावं असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.
आता, राज्य सरकारमधील नेतेही यावर भाष्य करत आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर आता फडणवीसांचे खास आमदार असलेल्या अभिमन्यू पवार यांनीही धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले आमदार अभिमन्यू पवार?
संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर बीडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेटही घेतली होती. त्यामुळे, यासंदर्भात त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले.
वाल्मीक कराड यांच्याशी असलेली धनंजय मुंडेंची जवळीक आणि नैतिक जबाबदारी यावर अभिमन्यू पवार यांचं मत विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासंदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, नैतिकतेचा विचार ज्याने त्याने करावा, असे उत्तर आमदार अभिमन्यू पवार यांनी दिले. तुळजापूर येथे नवसपूर्ती यात्रेसाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Sakhi
म्हणून विरोधकांकडून होतोय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
मस्साजोग येथील पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असलेली जवळीक, तसेच पवनचक्की वादातून सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या. याप्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही सापडले जात नाहीत. वाल्मिक कराड सीआडीकडे शरण आला असला तरी धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या जवळकीमुळे तपास प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, याप्रकरणी सरकारकडून एसआयटी नेमण्यात आली असून या एसआयटीच्या अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही म्हटले आहे.