रेल्वे पोलिसाचा आधी गळा दाबून केला खून, त्यानंतर रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतदेह
मोटरमनने पाहिला थरार, पोलिसांना कळवले, पण तोपर्यंत मारेकरी झाले फरार, मुंबईतील घटना
राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या काही महिन्यात खून, अत्याचार आणि बलात्काराच्या घटना वर्तमान पत्रांमध्ये दररोज वाचायला मिळत आहे. सध्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येवरुन राज्यभरात संतापाची लाट उसळली असतानाच, आता नवी मुंबईत चक्क एका रेल्वे पोलीस हवालदाराचाही खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणाऱ्या विजय चव्हाण यांची दोघा मारेकऱ्यांनी गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे गळा दाबून हत्या केल्यानंतर आरोपींनी त्या हवालदारास रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याचेही आता पोलिस तपासात समोर आलं आहे.
वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोन मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी रबाळे ते घणसोली रेल्वे मार्गावर मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
तपासाअंती हा मृतदेह एका रेल्वे पोलीस हवालदाराचा असल्याचं उघडकीस आलं आहे. पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले मृत विजय चव्हाण हे घणसोली येथे राहण्यास होते.
बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोघा व्यक्तींनी हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण यांना रबाळे ते घणसोली या रेल्वे स्थानकादरम्यान ठाण्याहून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या लोकलसमोर ढकलून दिले होते.
Sakhi
याबाबतची माहिती मोटरमनने रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सदर घटनेतील मृत व्यक्ती हे पवनेल रेल्वे पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण असल्याचे उघडकीस आले. दरम्यान, लोकल रेल्वेसमोर टाकून देण्यापूर्वी त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे तपासातून समोर आलं आहे.
या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर, चव्हाण यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. दरम्यान, अद्याप आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही, पण पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, एका पोलीस हवालादाराची अशारितीने हत्या करुन मृतदेह फेकून दिल्याने पोलीस खात्यातही खळबळ उडाली आहे.