बांगलादेश हिंदू अत्याचार प्रकरण; हिंदू संत चिन्मय प्रभू यांचा जामीन अर्ज फेटाळला
चितगाव कोर्टात चालली सुनावणी, आता हायकोर्टात धाव घेण्याची तयारी
Hindu Saint Chinmaya Prabhu Bail Application Rejected in Bangladesh : बांगलादेशातील हिंदू संत चिन्मय प्रभू दास यांचा जामीन अर्ज आज दुसऱ्यांदा फेटाळण्यात आला. वृत्तसंस्था डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार, चितगाव सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सैफुल इस्लाम यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद वाचून हा निर्णय दिला. या प्रकरणी सुमारे अर्धा तास सुनावणी चालली.
चिन्मय दास यांच्यावर बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना 25 नोव्हेंबर 2024 रोजी अटक करण्यात आली.
उच्च नायायलाचे दरवाजे ठोठावणार
या निकालानंतर चिन्मय प्रभू यांचे वकील अपूर्व भट्टाचार्य यांनी सांगितले की, ते जामीनाबाबत उच्च न्यायालयात अपील करण्याची तयारी करत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या 11 वकिलांचे पथक सकाळी 10.15 वाजता चितगाव कोर्टात पोहोचले.
यानंतर 11 वाजण्याच्या सुमारास या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. सुनावणीदरम्यान चिन्मय प्रभू यांना न्यायालयात हजर करण्यात आले नाही. याआधीही 3 डिसेंबर 2024 रोजी चिन्मय यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.
चिन्मय दास यांना 25 नोव्हेंबर रोजी झाली होती अटक
बांगलादेश पोलिसांनी चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना ढाक्याच्या हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 25 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर ते चितगावला जाणार होते. घटनास्थळी उपस्थित इस्कॉन सदस्यांनी सांगितले की, डीबी पोलिसांनी कोणतेही अटक वॉरंट दाखवले नाही. त्यांनी फक्त बोलायचे आहे असे सांगितले. यानंतर त्यांनी त्यांना मायक्रोबसमध्ये बसवले.
ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या गुप्तहेर शाखेचे (DB) अतिरिक्त पोलिस आयुक्त रेझौल करीम मल्लिक यांनी सांगितले की, पोलिसांच्या विनंतीनंतर चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्यात आली. चिन्मय दास यांना कायदेशीर प्रक्रियेसाठी संबंधित पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
संत चिन्मय प्रभू कोण आहेत?
चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांचे खरे नाव चंदन कुमार धर आहे. ते चितगाव इस्कॉनचे प्रमुख आहेत. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी देश सोडला. यानंतर हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर हिंसक घटना घडल्या.
यानंतर बांगलादेशी हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सनातन जागरण मंचची स्थापना करण्यात आली. चिन्मय प्रभू त्याचे प्रवक्ते झाले. सनातन जागरण मंचच्या माध्यमातून चिन्मय यांनी चितगाव आणि रंगपूरमध्ये अनेक सभांना संबोधित केले. त्यात हजारो लोक सहभागी झाले होते.