अभाविपच्या माध्यमातून राष्ट्र घडविण्याचे काम; राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 59 व्या देवगिरी प्रदेश अधिवेशनाचे उद्घाटन
लातूर /प्रतिनिधी: प्रत्येक विद्यार्थी स्वावलंबी बनला पाहिजे, त्याच्या बौद्धिक व शारीरिक क्षमता विकसित झाल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांमध्ये नम्रता व सेवाभाव असला पाहिजे, त्याच्यामध्ये सौजन्य व कर्मठता निर्माण झाली पाहिजे,यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काम करते.या कामातून राष्ट्र घडवणे ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची भूमिका असल्याचे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.
अभाविपच्या देवगिरी प्रदेशाच्या 59 व्या अधिवेशनाचे उदघाटक म्हणून राज्यपाल हरिभाऊ बागडे बोलत होते.व्यासपीठावर अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री एस बालकृष्णजी, प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ.सचिन कंदले, प्रदेश मंत्री वैभवी ढिवरे,स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मंडळा, सचिव सुनिल देशपांडे, महानगर अध्यक्ष प्रा.डॉ. प्रसाद कदम, महानगर मंत्री तेजुमई राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले की,विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून एक-एक कार्यकर्ता मनाने जोडला जातो. कार्यकर्त्यावर संस्कार करण्याचे काम विद्यार्थी परिषदे कडून केले जाते. जे काम सांगितले ते केलेच पाहिजे, ही शिकवण दिली जाते.अनेक मान्यवरांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य केलेले आहे.परिषदेत सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांनी परिषदेच्या कामासोबतच गुणवत्ता पूर्ण शिक्षण घ्यावे.आपल्या बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. आज केवळ प्रमाणपत्र मिळवून देणारे शिक्षण महत्त्वाचे नाही असे त्यांनी सांगितले.
राज्यपाल बागडे म्हणाले की, थॉमस मेकॉलेने लागू केलेली शिक्षण पद्धती ही भारतीय संस्कृती उखडून टाकण्यासाठी होती. कारकून घडविणारी ही शिक्षण पद्धती आता बदलण्यात आली आहे. 1400 शिक्षण तज्ञांनी विचारविनिमय करून नवीन शैक्षणिक धोरण ठरवले आहे.या धोरणात देश प्रथम ही भूमिका महत्त्वाची आहे. कौशल्य शिक्षण ही आजची गरज असून ज्याच्याकडे कला आहे तो कधीही उपाशी मरणार नाही. त्यामुळे या बाबीला नव्या धोरणात प्राधान्य दिले गेले आहे.
राज्यपाल बागडे म्हणाले की,नव्या धोरणाने राष्ट्राची दिशा ठरली आहे. आम्ही चालू ती पायवाट होईल. या पायवाटेची नंतर गाडीवाट व त्या पुढे जात गाडीवाटेचा महामार्ग होईल.हा महामार्ग देशाला परमवैभव मिळवून देईल, असेही बागडे म्हणाले. राज्यपाल बागडे यांनी सांगितले की, देशाची तरुणांकडून मोठी अपेक्षा आहे. 2047 मध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकाचा देश होईल, असे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. तरुणांच्या बळावरच त्यांनी हे स्वप्न पाहिले असून यामुळे तरुणांची जबाबदारी वाढली असल्याचेही ते म्हणाले.
Sakhi
राष्ट्रीय सहसंघटनमंत्री एस बालकृष्ण यांनी विद्यार्थी परिषदेच्या डीएनए मध्ये राजनीती नाही तर राष्ट्रनीती असल्याचे सांगितले. देशाची एकता व अखंडतेसाठी विद्यार्थी परिषद कार्य करते. परिषदेच्या कार्यकर्त्याचे जगणे आणि मरणेही भारत मातेसाठीच असते.साधारण विद्यार्थ्याला असाधारण व्यक्ती बनवण्याचे काम परिषदेमध्ये केले जाते, असेही ते म्हणाले.
प्रदेश मंत्री वैभवी ढिवरे यांनी विद्यार्थी परिषद हे आदर्श विद्यार्थी घडविणारे केंद्र असल्याचे सांगितले. विद्यार्थी परिषद हे संस्कारांचे व्यासपीठ आहे. चारित्र्यवान विद्यार्थी घडविणारे केंद्र आहे. ज्ञान, चारित्र्य व एकता या त्रिसूत्रीवर परिषदेचे कार्य चालते, असेही त्या म्हणाल्या.
प्रास्ताविकात प्रदेश अध्यक्ष प्रा.डॉ.सचिन कंदले यांनी आजचा विद्यार्थी हा आजचा नागरिक ही असल्याची संकल्पना विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात येत असल्याचे म्हटले. विद्यार्थी परिषदेच्या सहवासात येणारा विद्यार्थी संस्कारित होऊनच बाहेर पडतो, असेही ते म्हणाले.
स्वागत समितीचे अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी लातूर शहरात 25 वर्षांनी विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन होत असल्याचा आनंद व्यक्त केला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते अधिवेशनाच्या थीम सॉंगचे अनावरण करण्यात आले. सुनिल देशपांडे यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. सचिन कंदले, वैभवी ढिवरे,प्रमोद मुंदडा,तेजुमई राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनिल देशपांडे तर आभार प्रदर्शन तेजुमई राऊत यांनी केले. या अधिवेशनास मराठवाडा व खानदेशातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींसह स्वागत समिती पदाधिकारी व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उद्घाटन सत्रापूर्वी सकाळी अभाविपचे प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. सचिन कंदले व प्रदेश मंत्री वैभवी ढिवरे यांच्या हस्ते अधिवेशन स्थळी ध्वजारोहण करण्यात आले.