मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एनकाऊंटर होणार
कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा; म्हणाले- वाल्मिक कराडचे पोलिस ठाण्यात लाड सुरू
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो, अशी आमच्याकडे माहिती असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
मोठ्या आकाला वाजवण्यासाठी, पुरावा नष्ट होण्याची शक्यता विश्वासनीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी माझ्याशी बोलताना व्यक्त केली, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. वाल्मीक कराडचे सध्या पोलिस कोठडीमध्ये लाड सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच्यासाठीच काल पोलिस ठाण्यामध्ये नवीन पलंग पाठवले गेले. हे पलंग कशासाठी आणले गेले, याची चौकशी करण्याची मागणी देखील वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे केली.
खात्यावरुन मंत्रिमंडळात रणकंदन सुरू
मंत्रिमंडळामध्ये खात्यांवरून रणकंदन सुरू असल्याचा आरोप देखील वडेट्टीवार यांनी केला. अनेक मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. यावरून देखील वडेट्टीवार यांनी टीका केली. आधी मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी उशीर आणि पदभार घेण्यासाठी देखील उशीर होत आहे. यावरुन त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्यात धान खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
पालकमंत्री पदाचे वाटप लवकर करा
26 जानेवारी पर्यंत पालकमंत्री पद वाटप होईल, असे म्हटले जाते. मात्र इतके दिवस कशासाठी? अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे पालकमंत्री पदाचे वाटप लवकरात लवकर करायला हवे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. पाशवी बहुमत मिळून देखील मंत्रिमंडळ धड चालत नाही. पालकमंत्री नेमले जात नाही, मंत्री नेमून देखील ते पदभार घेत नाहीत, बंगले वाटपावरुन देखील भांडण सुरू आहे. त्यामुळे लोकांना वाऱ्यावर सोडून सत्तेमध्ये मलिदा खाण्यासाठी, सत्तेचे ऐश्वर्य भोगण्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, आणि महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडू नका, असे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
Sakhi
पोलिस बॉस म्हणून कराडला वागवतात
बीड मधील पोलिस हे वाल्मीक कराडलाच बॉस म्हणून वागवत असतात. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. आतापर्यंत झालेले जिल्हाधिकारी आणि एसपींचा देखील हाच अनुभव असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. हत्येच्या 22 दिवसानंतर देखील आरोपीला अटक होत नाही. यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे याकडे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष द्यायला हवे. याकडे त्यांनी लक्ष दिले नाही असा आरोप त्यांनी केला. तसे झाल्यास पोलिस विभागाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही, असे देखील ते म्हणाले.