चीनमधील विषाणू उद्रेकामुळे महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा सतर्क!
आरोग्य मंत्री व आरोग्य यंत्रणा कशी झाली सज्ज, काय घ्याल नेमकी काळजी?
महाभयंकर अशा कोरोना सारख्या विषाणूमुळे चीनमध्ये सध्या हाहाकार माजला आहे. HMPV म्हणजेच मानवी मेटान्यूमोव्हायरस चीनमध्ये वेगाने पसरत आहे. अनेक लोकांना याची लागण झाली असून चीनमधील रुग्णालयांमध्ये HMPV च्या रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे.याबाबत महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने राज्यातील यंत्रणेसह नागरिकांसाठी एक परिपत्रक काढले असून यातून महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याच्या आरोग्य मंडळाने जिल्हा रुग्णालयांना पत्र लिहलं असून यामध्ये HMPV माहिती दिली असून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभागाने लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं आहे हे पाहू:-
सध्या चीनमध्ये Human Metapneumovirus(HMPV) उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. मानवी मेटान्यूमोव्हायरस तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये २००१ मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमोव्हायरस हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो. या अनुषंगाने डीजीएचएस आणि संचालक, एन सी डी सी, दिल्ली यांनी दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी एक निवेदन प्रसिध्द केले आहे.
सध्या तरी महाराष्ट्रात एकही HMPV रुग्ण नाही
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापी खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
खालील गोष्टींचे पालन आवश्यक करा:-
1.जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
2. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
3.भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
4.संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.
हे करणे टाळावे:-
1. हस्तांदोलन
2.टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
3. आजारी लोकांशी जवळचा संपर्क
4.डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
5. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
5. डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषध घेऊ नका.
चीनमधून आलेल्या नवीन विषाणू Human Metapneumovirus (HMPV) अहवालांबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भितीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. तथापी या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करुन सर्दी-खोकला अर्थात आय एल आय/ सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत, असे सांगण्यात आले आहे.