Entertainment News : अभिनेता भाऊ कदम म्हणाला- अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे
दादांच्या राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार 'भाऊ'
मुंबई : मराठी अभिनेता आणि कॉमेडीयन भाऊ कदम अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करताना दिसणार आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. तर अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र यावे, असे देखील त्यांनी इच्छा व्यक्त केली.
प्रचंड मेहनत करणारा नेता 'दादा'
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना भाऊ कदम म्हणाले, अजित पवारांनी लाडकी बहीण योजना आणली. प्रचंड मेहनत करणारा नेता आहे, म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मी पक्षात प्रवेश केला नसून केवळ स्टार प्रचारक म्हणून काम करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. मी राजकारण करत बसलो तर सगळी कामे बाजूला राहतील, असेही भाऊ कदम म्हणाले.
अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे
भाऊ कदम म्हणाले, मी अजित पवारांना भेटलो तेव्हा त्यांनी मला विचारले, हवा येऊ द्या का बंद झाले, त्यांना तो कार्यक्रम खूप आवडायचा. स्ट्रेसमध्ये असलो की मी कार्यक्रम पाहायचो, असे त्यांनी मला सांगितले. पुढे बोलताना भाऊ कदम म्हणाले, पवार कुटुंबात काय झाले मला माहिती नाही, मात्र मला वाटते शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यायला हवे आणि अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा देखील त्यांनी बोलून दाखवली आहे. एकच वादा अजित दादा, गद्दारीबद्दल मी बोलणार नाही, त्यातील नेमकी माहिती माझ्याकडे नाही, असेही स्पष्टीकरण भाऊ कदम यांनी दिले.
शरद पवारांसोबतचा सांगितला किस्सा!
शरद पवारांचा एक किस्सा सांगताना भाऊ कदम म्हणाले, शरद पवार आणि माझी बारामतीमध्ये एका नाटकाच्या प्रयोगावेळी भेट झाली होती. त्यावेळी शरद पवारांनी एका नाटकात काम केले होते, त्याचा फोटो त्यांनी मला दाखवला होता. दरम्यान, शरद पवार आणि अजित पवारांनी पुन्हा एकत्र यावे असे अनेकांना वाटत असल्याचे दिसून येत आहे. यात भाऊ कदम यांनी देखील इच्छा व्यक्त करून दाखवली आहे.