अभाविप 59 वे देवगिरी प्रदेश अधिवेशन; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदर्शनी कक्षाचे उद्घाटन
शिक्षणाबरोबरच संस्कारही जपले पाहिजेत; जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर घुगे यांचे प्रतिपादन
ABVP Devgiri Adhiveshan लातूर/प्रतिनिधी: लातूर येथे होत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 59 व्या देवगिरी प्रदेश अधिवेशनात उभारण्यात आलेल्या प्रदर्शनी कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कक्षास शामभाऊ भार्गव कक्ष असे नाव देण्यात आले आहे.
या कक्षात वेगवेगळ्या ऐतिहासीक गोष्टीवर प्रकाश टाकला गेला आहे. देवगिरी प्रांत व मराठवाडा अभाविचा इतिहास दर्शवला आहे. या उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून चैतन्य भार्गव, डॉ. बबनराव बोडके, अभाविप प्रदेश उपाध्यक्ष प्रा. नाना गोडबोले, प्रदेश सहमंत्री प्रवीण पांडे, स्वागत समिती सहसचिव प्रवीण सावंत हे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना चैतन्य भार्गव म्हणाले की, माझ्यासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. 1999 मध्ये अभाविपचे अधिवेशन लातूरमध्ये झाले होते. तेव्हा माझे वडील श्यामसुंदरजी भार्गव अभाविपचे कार्यकर्ते होते. आज 25 वर्षानंतर माझ्या वडिलांचे नाव या प्रदर्शनी कक्षाला दिले गेले. सर्वांना त्यांची आठवण करून दिली याचा आनंद आहे.
Sakhi
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या जीवनातील विद्यार्थी दशेतील गोष्टी सांगितल्या. देवगिरी प्रांताशी माझी नाळ जोडलेली आहे असे उद्गार त्यांनी काढले.
विद्यार्थ्यांशी बोलताना त्या म्हणाल्या, आपण फक्त शिक्षण नव्हे तर त्याबरोबर संस्कारही जपले पाहिजेत. तंत्रज्ञानी व अभ्यासू विद्यार्थी या भारताला नकोय तर संस्कारही त्याच्यात असले पाहिजेत.
विद्यार्थ्यांनो तुम्ही जे क्षेत्र निवडाल त्यात आपली संस्कृती आपण विसरता कामा नये. सद्यस्थितीत वेगवेगळ्या माहितींचा भडीमार होत आहे. त्या दूर ठेवून आपण आपल्यातील शक्ती ओळखून आपले क्षेत्र निवडले पाहिजे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्वागत समिती सहसचिव प्रविण सावंत यांनी केले.