जरांगे पाटलांनी निवडणुकीतून का घेतली माघार; कोणाला होणार फायदा, कोणाला तोटा
नव्या भूमिकेबाबत काय केले दावे; जरांगे म्हणतात- ही माघार नाही, गनिमी कावा हाय
मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे एका जातीवर लढणे शक्य नसल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला.
पण, मराठा समाजाचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी त्यांची नवी भूमिका जाहीर केली.
मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेताना पाच दाखले दिलेत. एका जातीवर जिंकणे शक्य नाही, आपली फसगत होईल, कोणाला पाडायचे कोणाला आणायचे हे समाजाने ठरवावे, दलित-मुस्लीम-मराठा समीकरण जुळून आले असते तर चित्र वेगळे असते. ज्याला मतदान करायचे आहे त्या उमेदवाराकडून मराठा आरक्षणासंदर्भात लिहून घ्यावे, असे मुद्दे मनोज जरांगे यांनी आपल्या नव्या भूमिकेत मांडले आहेत. निवडणूक माघार घेण्यासाठी दिलेल्या दाखल्यांबाबत सविस्तर जाणून घ्या...
...तर आपली फसगत होईल. लोक आपल्यावर हसतील
मनोज जरांगे म्हणाले, रात्री दहा-एक हजार मराठा बांधव होते. त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली. एका जातीवर निवडणूक लढवायची का? यावर चर्चा झाल्यानंतर ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असे ठरवण्यात आले. राजकारण आपला खानदानी धंदा नाही. आपली फसगत होईल. लोक आपल्यावर हसतील. त्यामुळे सगळ्या बांधवांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
एका जातीवर जिंकणे शक्य नाही
विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली असली, तरी आपले आंदोलन चालूच राहील. ही निवडणूक संपली की पुन्हा आपल्या जातीसाठी लढू आणि आरक्षण मिळवू. एका जातीवर पुढे जायचे की नाही, यावर चर्चा झाली. एका जातीवर जिंकणे शक्य नाही. असे असूनही उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्यास समाजाचे वाटोळे केल्याचा आरोप माझ्यावर येईल. त्यामुळेच ही निवडणूक न लढता सगळी पाडापाडी करायची ठरवले असल्याचे मनोज जरांगे म्हणालेत.
याला पाडा, त्याला पाडा अशी माझी इच्छा नाही, पण...
माझ्याकडे रात्री साडेतीन वाजता उमेदवारांची यादी होती. मात्र, काही अडचणीमुळे मित्रपक्षांची यादी आली नाही. तेही आमचे बंधूच आहेत. याला पाडा, त्याला पाडा म्हणण्याची माझी इच्छा नाही. कारण कोणीही आपल्या कामाचे नाही. पण मराठा समाजाने मला भूमिका घेण्यास सांगितले. लोकांनी ज्याला पाडायचे, त्याला पाडा. ज्याला निवडून आणायचे, त्याला निवडून आणा, असेही जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले.
याला माघार नाही, तर गनिमी कावा म्हणतात
राज्यातील कोट्यवधी मराठा एक आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेत राहिलो तरी आमचा प्रभाव कायम राहणार आहे. दलित, मुस्लीम, मराठा समीकरण जुळून आले असते, तर राज्यात आमचे पाच-दहा, मुस्लिमांचे चार-पाच, दलितांचे चार-पाच आमदार झाले असते. पण ते शक्य झाले नाही. आम्ही माघार घ्यायची असती, तर पहाटे पाच वाजेपर्यंत बसलोच नसतो. याला माघार म्हणत नाही, याला थोडक्यात गनिमी कावा म्हणा, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
उमेदवाराकडून लिहून घ्या, व्हिडीओ करून घ्या
एका जातीवर निवडणूक लढवणे शक्य नाही, हे मी कालपासून सांगत होतो. आम्ही आमच्या मित्रपक्षांना आणखी एक-दोन दिवस दिले असते. पण आता वेळ उरला नाही. तुम्हाला ज्याला मतदान करायचे आहे त्या उमेदवाराकडून मराठा आरक्षणासंदर्भात लिहून घ्या, त्याच्याकडून व्हिडीओ करून घ्या, असेही जरांगे यांनी समाजाला आवाहन केले. मी माझे आंदोलन चालवणार आहे. मला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केल्यास, मी त्याचा निवडणुकीत कार्यक्रम करणारच, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.