आनंदाची बातमी : 'माझे पसंतीचे सिडकोचे घर'यासाठी महामंडळाने 2 अटी केल्या शिथील!
अर्जदारांना मिळाला मोठा दिलासा, कोणत्या शहरात आहे स्वप्नातील घरांची लॉटरी, वाचा सविस्तर
Cidco Lottery 2024 : सिडको महामंडळाने 11 ऑक्टोबरला जाहीर केलेल्या 26 हजार घरांच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या महागृहनिर्माण योजनेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. आता या योजनेतील नवीन अर्ज करणाऱ्यांना महामंडळाने दिलासा आहे. या अर्जात अडसर ठरणाऱ्या दोन अटी शिथील करण्यात आल्याने अर्जदार करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
काय केली अट शिथील?
अर्ज करणाऱ्यांना यापुढे बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्याची अट आणि स्टॅम्प पेपरवरची अट सिडकोने शिथिल केली आहे. नवीन अर्ज भरणाऱ्यांना कोऱ्या कागदावर स्वसाक्षांकित शपथपत्र / वचनपत्र सादर करता येणार आहे. अर्ज भरायला 45 दिवसांपूर्वी सुरुवात झाली.
मात्र सामान्यांच्या मागणीचा विचार करून सिडको मंडळाच्या अधिका-यांनी मंगळवारी हा निर्णय जाहीर केला. बारकोड नसलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा सिडकोने दिली असली तरी वाटपपत्र देण्यापूर्वी बारकोड असलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे.
कोणत्या ठिकाणी किती जागा?
सिडको महामंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ ही महागृहनिर्माण योजनेची सोडत प्रक्रियेला सुरुवात केली. या योजनेमध्ये तळोजात सर्वाधिक १३ हजार घरे आहेत तर उर्वरित घरे खारघर, वाशी, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, बामनडोंगरी, खारकोपर, कळंबोली अशा विविध नोडमध्ये आहेत. ११ डिसेंबरपर्यंत या योजनेसाठी नागरिक ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटामधील नागरिकांना ही घरे मिळणार आहेत. अर्जदारांना त्यांच्या पसंतीचे घर निवडण्याचे स्वातंत्र्य या योजनेत असणार आहे. अर्जदारांना ऑनलाइन अर्ज करताना ओळखपत्राच्या कागदपत्रांसोबत उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र इ. आवश्यक कागदपत्रांची पुर्तता घर सोडतीमध्ये लागण्यापूर्वी करावी लागत आहे.